पाकिस्तानची अंतिम फेरीत धडक

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

कार्डिफ - प्रत्येक सामन्यागणिक कामगिरी उंचावत नेणाऱ्या पाकिस्तानने यजमान आणि ताकदवान इंग्लंडचा सहज पराभव करून चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. फॉर्मात असलेल्या इंग्लिश फलंदाजांना शरणागती स्वीकारण्यास भाग पाडणाऱ्या पाकिस्तानने हा सामना आठ गडी राखून जिंकला.

कार्डिफ - प्रत्येक सामन्यागणिक कामगिरी उंचावत नेणाऱ्या पाकिस्तानने यजमान आणि ताकदवान इंग्लंडचा सहज पराभव करून चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. फॉर्मात असलेल्या इंग्लिश फलंदाजांना शरणागती स्वीकारण्यास भाग पाडणाऱ्या पाकिस्तानने हा सामना आठ गडी राखून जिंकला.

फलंदाजी ही इंग्लंडची ताकद होती; पण तिला सुरुंग लावताना पाकिस्तानने त्यांना 211 धावांत गुंडाळले आणि तेथेच त्यांनी अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर हे माफक आव्हान 37.1 षटकांत पार करून त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना प्रतिकार करण्याचीही संधी ठेवली नाही. अझर अली (76) व फकर झमान (57) यांनी शतकी सलामी देऊन आपल्या गोलंदाजांच्या दिमाखदार कामगिरीवर सोनेरी मुलामा दिला.

तत्पूर्वी साखळी सामन्यातील खेळामुळे इंग्लंडकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते; परंतु ऐन महत्त्वाच्या सामन्यात 200 धावा करतानाही त्यांची दमछाक झाली. बांगलादेशविरुद्ध 35, न्यूझीलंडविरुद्ध 29 व बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धही 35 चौकारांची आतषबाजी करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांना पोषक खेळपट्टीवरही आज अवघे 15 चौकार मारता आले. यावरून त्यांच्या फलंदाजीची स्थिती किती नाजूक झाली होती हे स्पष्ट होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणकेबाज शतक करणारा बेन स्टोक्‍स आज 64 चेंडूंत एकही चौकार मारू शकला नाही. एवढी नियंत्रित गोलंदाजी पाकिस्तानने केली.

पाक कर्णधार सर्फराझ अहमदने इंग्लंडला फलंदाजी दिली, तेव्हा अनेकांनी या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. त्यानंतर जेसन रॉयऐवजी संघात आलेल्या बेअरिस्टो व अलेक्‍स हेल्स यांनी 34 धावांची सलामी दिली. हेल्स खराब फटका मारून बाद झाला. त्यानंतर बेअरिस्टो व ज्यो रूट यांनी संघाची धावसंख्या 128 पर्यंत नेली तरी परिस्थिती इंग्लंडच्या नियंत्रणात होती; परंतु त्यानंतर रूट, कर्णधार मॉर्गन व जोस बटलर हे मधल्या फळीचे तीन खंदे फलंदाज 20 धावांच्या फरकाने बाद झाले. 2 बाद 128 वरून 5 बाद 148 अशी घसरगुंडी उडाली आणि तेथेच इंग्लंडच्या डावाला कलाटणी मिळत गेली.

इंग्लंडला रोखू शकतो या आत्मविश्‍वासाला बळकटी मिळाल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी अचूकता अधिक तीव्र केली. त्यामुळे बेन स्टोक्‍ससारख्या फलंदाजालाही चौकार मारता आला नाही. सर्फराज अहमदचे गोलंदाजीतील बदलही मोलाचे ठरले. हसन अलीने तीन, तर जुनेद खान व महम्मद आमेरऐवजी पदार्पणाची संधी मिळालेल्या रूमान रईस यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 49.5 षटकांत सर्व बाद 211 (जॉनी बेअरिस्टो 43- 57 चेंडू, 4 चौकार, ज्यो रूट 46- 56 चेंडू, 2 चौकार, ईऑन मॉर्गन- 33, बेन स्टोक्‍स 34- 64 चेंडू; जुनेद खान 8.5-042-2, रूमान रईस 9-0-44-2, हसन अली 10-0-35-3) पराभूत वि. पाकिस्तान : 37.1 षटकांत 2 बाद 215 (अझल अली 76- 100 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, फकहर झमान 57- 58 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार).

Web Title: sports news marathi news cricket match score cricket score