आव्हानाचा पाठलाग सोपा नव्हता - मिताली राज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

आमची गोलंदाजी चांगली झाली. भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीचा अधिक चांगला फायदा करून घेतला. दर्जेदार गोलंदाजीसमोर आमच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी आडव्या बॅटने फटके खेळले, ते चुकीचे होते. असेच आडव्या बॅटने सहकारी खेळत राहिल्यास त्यांचे भवितव्य धोक्‍यात आहे. 
- सना मीर, पाकिस्तानची कर्णधार

डर्बी - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिलांनी सलग तिसरा विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवताना त्यांनी नीचांकी धावसंख्येचा बचाव करून खऱ्या अर्थाने अष्टपैलू संघ अशी ओळख करून दिली. खराब झालेल्या खेळपट्टीवर पाकिस्तानलाही आव्हानाचा पाठलाग सोपा नसणार, हे आम्ही ओळखले होते त्यानुसारच खेळ केला, अशी प्रक्रिया भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केली. 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी प्रथमच कोमेजली होती. भारतीय संघाला पावणे दोनशे धावाही करता आल्या नव्हत्या. मिताली म्हणाली, ‘‘जेव्हा पहिल्या दहा षटकांत तुम्ही एक फलंदाज गमावता, तेव्हा सहाजिकच तुमच्यावर दडपण येते. त्यानंतर एक संयमी भागीदारी झाली. त्या वेळीहीदेखील आमच्या दोन विकेट झटपट पडल्या. त्यामुळे आम्हाला बॅकफूटवर रहावे लागले. त्यानंतर सुषमा आणि झुलन यांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या फलंदाजीमुळे आम्हाला १७० धावांचे आव्हान ठेवता आले. पहिले चार फलंदाज बाद झाले, तेव्हाच आम्ही तेवढेच उद्दिष्ट ठेवले होते.’’

प्रतिस्पर्ध्यांसमोर आम्ही किरकोळ आव्हान ठेवले असले, तरी पहिल्या काही षटकांत ब्रेक थ्रू मिळाल्यास त्यांच्यावर दडपण येणार होते, असे सांगून मिताली म्हणाली, ‘‘खेळपट्टी दुसऱ्या डावात आणखीनच खराब झाली होती. त्यामुळे पाकिस्तानलाही पाठलाग करण्यास कठिण जाणार हे जाणून होतो. फिरकी गोलंदाजांना येथे कमालीची साथ मिळत होती. ’’

एकूण निर्णयाबाबत मिताली म्हणाली, ‘‘एक दिवस असा असतो, की जेव्हा तुमचे फलंदाज चमकून जातात. पण, प्रत्येक दिवशी तुमचे फलंदाजच चमकतील असे नाही. या सामन्यात आमच्याबाबत हेच घडले. मात्र, गोलंदाजांनी विश्‍वास सार्थ ठरवला.’’

Web Title: sports news mitali raj