नाशिकच्या संजीवनी जाधवला ब्राँझ

नरेश शेळके
शुक्रवार, 7 जुलै 2017

आजच्या अंतिम स्पर्धा
पुरुष ः तिहेरी उडी, गोळाफेक, ४०० मीटर, १५०० मीटर, १०० मीटर. महिला ः उंच उडी, ४०० मीटर, १५०० मीटर, हतोडाफेक, १०० मीटर

भुवनेश्‍वर - आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरलेल्या भारतीय ॲथलिट्‌सने येथील कलिंगा स्टेडियमवर २२ व्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी २ सुवर्णपदकांसह सात पदके मिळवीत पदकतालिकेत आघाडी घेतली. महिलांच्या गोळाफेकीत मनप्रीत कौर तर पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत जी. लक्ष्मणने सुवर्णपदकावर नाव कोरले. दोघांचे हे आशियाई स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक होय. 

पुरुषांच्या थाळीफेकीतील आशास्थान विकास गौडाला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले तर महिलांच्या लांब उडीत व्ही. निनाचे सुवर्णपदक थोडक्‍यात हुकले. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर नयना जैम्सने ब्राँझपदक जिंकले. कविता राऊतनंतर नाशिकची पताका फडकविणाऱ्या संजीवनी जाधवने पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. 

यंदा चीनमध्ये झालेल्या आशियाई ग्रॅंडप्रिक्‍स स्पर्धेत १८.८६ या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनप्रीतने १८.२८ मीटर अंतरावर गोळा फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. दोन वर्षांपूर्वी वुहानच्या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या जी. लक्ष्मणनने पाच हजार मीटर शर्यतीत शेवटच्या फेरीत वेग वाढवित पदकाचा रंग सोनेरी केला. त्याने १४ मिनिटे ५४.४८ सेकंद वेळात शर्यत पूर्ण केली. कतारचा यासेर सलेम रौप्य तर सऊदी अरेबियाचा तारीक अहमद ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. भारताचा दुसरा धावपटू मुरली गावीतला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत संजीवनी जाधवने सुरवात भन्नाट केली. चार फेऱ्यापर्यंत ती आघाडीवर होती. शेवटच्या फेरीत कझाकिस्तानच्या दारिया मासलोव्हाला गाठणे संजीवनी व माजी विजेत्या संयुक्त अरब अमिरातच्या आलिया सईदला शक्‍य झाले नाही. शेवटच्या साठ मीटरमध्ये आलियाने संजीवनीला मागे टाकीत १५ मिनिटे ५९.९५ सेकंदात रौप्य जिंकले. विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीने १६ मिनिटे ००.२४ सेकंदात शर्यत पूर्ण केली. कविता राऊतनंतर आशियाई ॲथेलटिक्‍स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणारी ती नाशिकची दुसरी धावपटू ठरली. कविताने २००९ च्या गुंगझाओ स्पर्धेत दोन पदके जिंकली होती. सुवर्णपदक विजेत्या दारियाने १५ मिनिटे ५७.९५ सेकंद वेळ दिली. 

पुरुषांच्या थाळीफेकीत २०१३ व २०१५ च्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या विकास गौडाची सुरवात निराशजनक झाली. उलट सुवर्णपदक विजेत्या एहसान हदादीने पहिल्याच प्रयत्नात ६१.६७ मीटर अंतरावर थाळी फेकून आपले इरादे स्पष्ट केले. लंडन ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या एहसानने शेवटच्या प्रयत्नात ६५.५४ मीटर अंतरावर थाळी फेकून सुवर्णपदक निश्‍चित केले. त्याचे हे कारकिर्दीतील पाचवे सुवर्णपदक होय. मलेशियाच्या महम्मद इरफानने शेवटच्या प्रयत्नात ६०.९६ मीटरवर थाळी फेकीत रौप्यपदक मिळविले. विकासला ६०.८१ मीटर कामगिरीसह ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. 

महिलांच्या लांब उडीत व्हिएतनामची बु थी थू आणि भारताची व्ही. निना यांची ६.५४ मीटर अशी सारखीच कामगिरी होती. मात्र, निनाची दुसरी सर्वोत्तम उडी ६.२५ तर बु हिची ६.४४ असल्याने नियमाप्रमाणे बु हिला सुवर्णपदक मिळाले. भारताच्या नयना जैम्सला ६.४२ मीटरसह ब्राँझपदक मिळाले. महिलांच्या भालाफेकीत ली लिंगवेईने सुवर्णपदक जिंकले. भारताची राष्ट्रीय विक्रमवीर अनू राणीला ५७.३२ मीटरसह ब्राँझपदक मिळाले.  

Web Title: sports news nashik sajeevani jadhav