राज्याच्या पुरुषांची आगेकूच; महिलांचे अाव्हान संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे - वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला संघाचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दिल्लीचे आव्हान ४३-३५ असे परतवून लावले. महिला संघाला हिमाचल प्रदेशकडून ३०-२६ असा पराभव पत्करावा लागला. 

पुणे - वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला संघाचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दिल्लीचे आव्हान ४३-३५ असे परतवून लावले. महिला संघाला हिमाचल प्रदेशकडून ३०-२६ असा पराभव पत्करावा लागला. 

हैदराबादमधील गच्चीबाऊली येथील बंदिस्त क्रीडासंकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी पश्‍चिम बंगालचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्यांना हिमाचल प्रदेशाचा बचाव भेदता आला नाही. त्यांच्या कोपरारक्षकांनी लावलेल्या जाळ्यात महाराष्ट्राची अभिलाषा म्हात्रे अलगद सापडत होती.

विश्रांतीला महिला १०-१३ अशा तीन गुणांनी पिछाडीवर होत्या. उत्तरार्धात ही पिछाडी ९ गुणांपर्यंत वाढली होती. त्या वेळी स्नेहल शिंदे आणि सायली केरिपाळे यांच्या चढायांमुळे महाराष्ट्राच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतरही त्यांना केवळ पिछाडी कमी केल्याचेच समाधान लाभले. सायलीने ७; तर स्नेहलने सहा गुणांची कमाई केली. पूर्वार्धात स्वीकारावा लागलेला लोणही महाराष्ट्राला महाग पडला.  

महाराष्ट्राच्या पुरुषांनी सफाईदार खेळ करत दिल्लीचे आव्हान विश्रांतीच्या २८-१२ अशा आघाडीनंतर ४३-३५ असे परतवून लावले. उत्तरार्धात दिल्लीने पिछाडीने भरून काढत सामन्यात रंगत आणली. मात्र, विश्रांतीला मिळविलेली आघाडी महाराष्ट्राच्या कामी आली. कर्णधार रिशांक देवाडिगाने मिळविलेले १२ गुण महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरले.

निकाल 
महिला उपांत्यपूर्व फेरी - रेल्वे वि. वि. उत्तर प्रदेश ३९-२५, पंजाब वि.वि. छत्तीसगड ३१-२३़, हरियाना वि. वि. केरळ ४४-१५.

पुरुष - उप-उपांत्यपूर्व फेरी - कर्नाटक वि.वि. तमिळनाडू ३७-२७, उत्तराखंड वि.वि. आंध्र प्रदेश ५२-३१, उत्तर प्रदेश वि.वि. केरळ ६०-३१, राजस्थान वि.वि. गुजरात ५१-३६, रेल्वे वि.वि. मध्य प्रदेश ४३-३१, हरियाना वि.वि. हिमाचल प्रदेश ३६-३४(पूर्ण वेळेत ३०-३०)

Web Title: sports news national kabaddi competition