युवा जगज्जेती शशी अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - जागतिक युवा विजेत्या शशी चोप्राने पदार्पणाच्या राष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिची अंतिम फेरीत लढत आशियाई उपविजेत्या सोनिया लाथेरविरुद्ध होईल. राष्ट्रीय महिला बॉक्‍सिंग स्पर्धेच्या सांगतादिनी सर्वांचे लक्ष याच लढतीकडे असेल.

शशीचा उपांत्य फेरीत चांगलाच कस लागला. तिची उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी सोनियाने (आंध्र प्रदेश) शशीच्या खेळाचा अभ्यास करून तयारी केली होती. सोनियाने तिच्या उंचीचाही पुरेपूर फायदा घेतला होता. त्याचबरोबर शशीला ती जास्त जवळही येऊ देत नव्हती. जिगरबाज शशीने सुरवातीच्या पिछाडीनंतर जोरदार प्रतिकार केला. तिने गुडघ्यात काहीसे झुकते ताकदवान ठोसे दिले आणि अखेर ३-२ बाजी मारली.

फ्लायवेट गटात निखत झहीन हिला पुनरागमनाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली. हरयानाच्या रिटाने तिला ४-१ असे हरवले. चारवेळच्या विजेत्या सरजू बालाने मीनाक्षीला ४-१ असे हरवले. सरजू बाला गतवर्षीपर्यंत ४८ किलो गटात होती; पण यंदा ती ५१ किलो गटात सहभागी झाली आहे. तरीही तिची विजयी वाटचाल कायम आहे.

हेवीवेट गटात आशियाई विजेत्या कविता चहलची लढत माजी आशियाई ब्राँझ विजेत्या सीमा पुनियाविरुद्ध होईल. दोघींनीही ५-० असा अपेक्षित विजय मिळविला. सरिता देवीने सुवर्णपदकाचा धडाका राखताना पवित्राला प्रतिकाराची संधी दिली नाही.

Web Title: sports news national women boxing competition