राष्ट्रीय कुस्तीत नवे गट, स्वरूप मात्र जुनेच

संजय घारपुरे
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयावर देशातील कुस्तीगिरांमध्ये नाराजीचा सूर

मुंबई - जागतिक कुस्ती महासंघाने स्पर्धेत नवे वजनी गट तयार करतानाच स्पर्धा एकऐवजी दोन दिवसांची करण्याचे ठरवले. भारतीय कुस्ती महासंघाने नव्या गटानुसार स्पर्धा घेतानाच स्पर्धा एका दिवसातच खेळविण्याचे ठरवले आहे. यामुळे कुस्तीगीर नाराज आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयावर देशातील कुस्तीगिरांमध्ये नाराजीचा सूर

मुंबई - जागतिक कुस्ती महासंघाने स्पर्धेत नवे वजनी गट तयार करतानाच स्पर्धा एकऐवजी दोन दिवसांची करण्याचे ठरवले. भारतीय कुस्ती महासंघाने नव्या गटानुसार स्पर्धा घेतानाच स्पर्धा एका दिवसातच खेळविण्याचे ठरवले आहे. यामुळे कुस्तीगीर नाराज आहेत.

जागतिक कुस्ती महासंघाने खेळाची प्रसिद्धी वाढवण्यासाठी स्पर्धा दोन दिवसांची करण्याचे ठरवले. त्याचबरोबर सुरवातीस यासाठी दुसऱ्या दिवसासाठी दोन किलोची सूटही देण्याचे ठरवले. त्याचबरोबर वजनी गट आठवरून दहा करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नव्या वर्षातील राष्ट्रकुल, तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा लक्षात घेऊन हे दोन्ही बदल अमलात येतील, अशीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यातील वजनी गट बदलण्याचेच ठरवले आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान इंदूरला होणार आहे. 

नव्या वर्षापासून कुस्तीतील दोन्ही नियम अमलात येणार आहेत. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा नवे वर्ष सुरू होण्यापूर्वी जेमतेम दीड महिना होत आहे. यामुळे या दोन्ही नियमांची सवय या स्पर्धेपासून व्हावी अशी अपेक्षा होती; मात्र दोन दिवसांच्या स्पर्धेचा नियम अमलात न आणण्याचे ठरले. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा डिसेंबरमध्ये आहे. त्यामुळे हा बदल पुढील स्पर्धांपासून होईल, असे भारतीय कुस्तीचे पदाधिकारी सांगत आहेत. कुस्ती अभ्यासकांना हे मान्य नाही. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेचा प्रगतीसाठी फारसा फायदा होत नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी नव्या नियमानुसार गुणवत्ता शोधायची असेल, तर राष्ट्रीय स्पर्धा चांगली संधी होती. ती आपण दवडत आहोत. आता दुसऱ्या दिवशी जरी पदकाचीच लढत केवळ असली, तरी त्याची सवय राष्ट्रीय स्पर्धेपासूनच हवी, असे मत व्यक्त होत आहे. 

राष्ट्रीय स्पर्धेतील वजनी गट
फ्रीस्टाइल - ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७, १२५ किलो
ग्रीको रोमन - ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७, १३० किलो 
महिला - ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२, ७६ किलो

भारतीय कुस्ती महासंघाने यापूर्वी जागतिक महासंघाने केलेले बदल लगेचच अमलात आणले आहेत. हरियाना, पंजाब, तसेच उत्तरेतील अनेक कुस्तीगिरांना वाढत्या स्पर्धांमुळे नव्या नियमांची सवय होते. राष्ट्रीय स्पर्धेद्वारे गुणवत्ता दाखवणाऱ्यांना कुस्तीगिरांची नव्या नियमानुसार चाचणी कशी होणार?
- कृपाशंकर बिश्नोई, कुस्ती मार्गदर्शक

जागतिक स्पर्धेच्या नियमानुसार दोन दिवसांच्या स्पर्धेत पदकाच्या लढती दुसऱ्या दिवशी होणार आहेत. हा नियम राष्ट्रकुल स्पर्धेला लागू नाही. नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा आहे, तर डिसेंबरमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा. ही राष्ट्रकुल स्पर्धा जुन्याच नियमानुसार होणार आहे. त्यामुळे आम्ही भविष्यावर नजर ठेवून वजनी गट वाढवले आहेत. स्पर्धा जुन्या नियमानुसार एकाच दिवसात संपेल.
- विनोद तोमर, भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यकारी सचिव

भारतीय कुस्ती महासंघाला खेचर संबोधल्याने नोटीस

भारतीय कुस्ती महासंघाने राष्ट्रीय स्पर्धेतील वजन गट बदलताना स्पर्धा एकाच दिवसात संपवण्याचे ठरवले आहे. महासंघाच्या या निर्णयामुळे संतप्त झालेले अर्जुन पुरस्कार विजेते कृपाशंकर पटेल यांनी भारतीय कुस्ती महासंघाची तुलना खेचराबरोबर केली. पटेल यांच्या सोशल मीडियावरील टीकेमुळे संतापलेल्या भारतीय कुस्ती महासंघाने पटेल यांना थेट ‘कारणे दाखवा’ नोटीसच बजावली आहे. 

पटेल फेसबुक पेजवर म्हणतात, ‘कच्छच्या वाळवंटात एक प्राणी आढळतो, तो गाढव नाही किंवा घोडाही नाही. तो या दोघांमधील खेचर आहे. असाच काहीसा अर्धवट निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे.’ या पोस्टसोबत पटेल यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या बोधचिन्हासोबत खेचरचे चित्रही दिले आहे. अर्जुन पुरस्कार विजेते कृपाशंकर पटेल हे भारतीय कुस्तीत कृपाशंकर बिश्‍नोई म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांनी कृपाशंकर यांना महासंघाची तुलना खेचराबरोबर केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. आपण या नोटीसला सात दिवसांत उत्तर द्यावे. आपल्यावर सहा वर्षांची बंदी येऊ शकते, असाही इशारा भारतीय महासंघाने पटेल यांना दिला आहे.

Web Title: sports news national wrestling new group