दीर्घ ब्रेकचे जोकोविचचे संकेत

पीटीआय
शुक्रवार, 14 जुलै 2017

जोकोविचचे ग्रहण
गेल्या वर्षी फ्रेंच ओपन जिंकून ‘करिअर स्लॅम’ची पूर्तता
त्यानंतर मात्र ग्रॅंड स्लॅम यशाची हुलकावणी
विंबल्डनमध्ये तिसऱ्या फेरीत सॅम क्वेरी, तर अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टॅन वॉव्रींकाविरुद्ध पराभूत
यंदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेत दुसऱ्या, तर फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
यंदा ३२ विजय-आठ पराभव अशी कामगिरी
यंदा दोनच विजेतीपदे

लंडन - खासगी जीवनातील समस्यांशिवाय फॉर्म आणि पर्यायाने कामगिरीला ग्रहण लागल्यानंतर सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याला विंबल्डन स्पर्धेत कोपराच्या दुखापतीचा धक्का बसला. या पार्श्‍वभूमीवर तन तसेच मन तंदुरुस्त व्हावे म्हणून दीर्घ ब्रेक घेण्याचा तो गांभीर्याने विचार करीत आहे. त्याला शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

जोकोविचचे चौथ्या विंबल्डन विजेतेपदाचे ‘मिशन’ बुधवारी अपयशी ठरले. टोमास बर्डीचविरुद्धच्या लढतीतून माघार घेतल्यानंतर जोकोविचने याविषयी स्पष्ट संकेत दिले. गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून त्याला दुखापतीने त्रस्त केले आहे. वेदना असह्य झाल्यामुळे माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता, असे त्याने सांगितले.

दुखापतीविषयी तो म्हणाला, ‘‘डॉक्‍टर शस्त्रक्रिया करावी असे सुचवण्याची शक्‍यता आहे, पण तो पर्याय काही चांगला आहे असे वाटत नाही. शस्त्रक्रिया किंवा गोळ्यांच्या रूपाने शरीरात रसायने मिसळू देणे असे दोन्ही उपाय चांगले नाहीत. तार्किक निष्कर्षापर्यंत यायचे झाल्यास विश्रांतीची गरज भासते. त्यासाठी दीर्घ ब्रेक हा तार्किक उपाय ठरेल. ’’

जोकोविचच्या खांद्याला सुद्धा दुखापत झाली आहे. विंबल्डनपूर्वी त्याने कोपऱ्याच्या दुखापतीविषयी वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा केली होती. तो म्हणाला, ‘‘डॉक्‍टरांनी स्पष्ट असे काही सांगितलेले नाही. दुखापत होते आणि बरी होते तोपर्यंत ठीक आहे. हे कदाचित सात-आठ-दहा महिने चालले, पण पुढील सात महिन्यांचे चित्र फारसे चांगले नाही. मी जेवढे जास्त खेळतो तेवढी दुखापत चिघळते.’’  

Web Title: sports news Novak Djokovic