अखेर मुंबईला विजय गवसला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मुंबई - अखेर घरच्या मैदानावर यू मुम्बाला पहिला विजय गवसला. त्यांनी बुधवारी झालेल्या सामन्यात हरियाना स्टीलर्सचा ३८-३२ असा पराभव केला. काही चुका केल्यानंतरही प्रत्येक सुपर टॅकलला बचावपटूंनी केलेली कामगिरी मुंबईच्या विजयात मोलाची ठरली.

मुंबई - अखेर घरच्या मैदानावर यू मुम्बाला पहिला विजय गवसला. त्यांनी बुधवारी झालेल्या सामन्यात हरियाना स्टीलर्सचा ३८-३२ असा पराभव केला. काही चुका केल्यानंतरही प्रत्येक सुपर टॅकलला बचावपटूंनी केलेली कामगिरी मुंबईच्या विजयात मोलाची ठरली.

अनुप कुमार, काशिलिंग आडके व श्रीकांत जाधव यांनी चढायांमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवले; परंतु कुलदीप व सुरेंद्रसिंग यांनी काही वेळा चुका करूनही निर्णायक वेळी संयम दाखवला. त्यांचा उतावीळपणाच मुंबईला वेळोवेळी घातक ठरत आहे. हरियानाने हुकमी खेळाडू मोहित चिल्लर व सुरेंद्र नाडा हे पूर्वीचे मुंबईकर; पण आज ते अनुप, काशी व श्रीकांत यांच्यासमोर निष्प्रभ ठरले. त्यापेक्षा त्यांचे प्रयत्नच दिसले नाहीत.  

काशिलिंग व श्रीकांत या मराठी खेळाडूंच्या यशस्वी चढायांच्या जोरावर मुंबईने जोरदार सुरवात केली. बचावही चांगला झाला. त्यामुळे ७-२ अशी आश्‍वासक सुरवात झाली. याचवेळी हरियानाकडे दोनच खेळाडू असल्यामुळे त्यांच्यावर लोण देण्याची संधी मुंबईला होती; परंतु हरियानाचा चढाईपटू दीपक दहियाला बोनस गुण दिल्यानंतर त्याची पकड करण्याची घाई मुंबईला नडली. असे दोनदा घडले. दुसरीकडे अनुप कुमार चढाईगणिक एकेक खेळाडू बाद करत होता. अखेर हरियानाचा अखेरचा खेळाडू बाद करून, त्यांच्यावर लोण देण्यासाठी मुंबईला १२ व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली.

१५-९ अशा आघाडीनंतर श्रीकांतने पुन्हा दोन गुण मिळविले. सर्व काही ठरल्याप्रमाणे घडत असताना मुंबईच्या बचावाने पुन्हा क्षुल्लक चुका करण्यास सुरवात केली. त्यामुळे त्यांना २४-१६ अशी आघाडी गमावत लोण स्वीकारणे भाग पडले. गुणफलक २५-२२ वरून २७-२७ अशा बरोबरीत आला. अखेरची १० मिनिटे असताना अनुपने एकाच चढाईत मोहित चिल्लर व सुरेंद्र नाडा यांना बाद केले; पण त्यानंतर तोही बाद झाला. मुंबईकडे केवळ तीन खेळाडू असताना बदली बचावपटू म्हणून आलेल्या इराणच्या हादीने दोनदा ‘सुपर टॅकल’ करत मुंबईला हात दिला. येथेच गुणांमधला फरक वाढला आणि विजयही निश्‍चित झाला.

Web Title: sports news pro kabaddi