पाटणाच्या प्रदीप नरवालची जयपूर पिंक पँथर्सला डुबकी

पीटीआय
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

कोलकता - सर्वच बचावपटूंची धास्ती वाढवलेल्या प्रदीप नरवालच्या जोरदार आक्रमणास जयपूर पिंक पॅंथर्सच्या सदोष बचावात्मक खेळाची ‘साथ’ लाभली, त्यामुळे पाटणा पायरेटस्‌ने विजयी धडाका कायम ठेवताना जयपूरला ४७-२१ असे सहज हरवले. 

कोलकता - सर्वच बचावपटूंची धास्ती वाढवलेल्या प्रदीप नरवालच्या जोरदार आक्रमणास जयपूर पिंक पॅंथर्सच्या सदोष बचावात्मक खेळाची ‘साथ’ लाभली, त्यामुळे पाटणा पायरेटस्‌ने विजयी धडाका कायम ठेवताना जयपूरला ४७-२१ असे सहज हरवले. 

नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमवर अभिषेक बच्चनचा जयपूर आणि पाटणा यांच्यात चांगली चकमक बघावयास मिळेल अशी अपेक्षा होती, पण सुरुवातीस आपल्या खेळाडूंइतकाच  आक्रमक असलेल्या अभिषेकला पाटणाच्या विशेषत- प्रदीपच्या जोरदार खेळाने शांत केले. त्यातच प्रदीपऐवजी अन्य आक्रमक चढाईस आल्यावर त्याची पकड करण्याची जयपूरची चाल त्यांना भोवली. बचावपटूत पुरेसे सामंजस्य नसल्यामुळे अनेकदा एकहातीच प्रयत्न झाला. प्रदीपने बावीसपैकी तेरा चढायात गुण मिळवले, तर त्याची केवळ दोनदाच पकड झाली. 

डुबकी मास्टर प्रदीप नरवालने त्याच्या सामन्यातील चौथ्या चढाईत चार गुण घेत या स्पर्धेतील चढाईच्या गुणांचे शतक पूर्ण केले. त्याचा घोटा पकडण्याचा जयपूरचा प्रयत्न फसला. प्रदीपने त्यांना गुंगारा देत मध्यरेषा सहज गाठली होती. त्यामुळे पाटणाने  सातव्या मिनिटास लोण दिला. मध्यांतरापूर्वीच प्रदीपने सुपर टेन करताना संघाचे निम्मे गुण नोंदवले होते. पाटणाने उत्तरार्धात  काही मिनिटातच दुसरा लोण देत २४-९ आघाडी घेतली. त्यात प्रदीपचे अकरा तर लोणचे चार गुण होते. त्याने संघाच्या ४७ पैकी एकवीस गुण घेतले, तर आठ गुण लोणचे होते. याचाच अर्थ अन्य अठरा गुणच त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी मिळवले. प्रदीपचा चढाईतील सहकारी मोनू गोयत याने सुपर टेन करीत संघाच्या विजयात आपलाही वाटा उचलला. पवन कुमारचे चढाईतील सात गुण सोडल्यास जयपूरकडून कोणाचाही प्रभाव पडला नाही.

Web Title: sports news pro kabaddi

टॅग्स