पाटणा सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

पाटणा सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

चेन्नई -  प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात चढाईत गुणांचे त्रिशतक झळकाविणारा प्रदीप नरवाल या सामन्यातही धडाधड गुण मिळवत गेला आणि गुरुवारी पाटणा पायरेट्‌स संघाने त्याच्या आणखी एका सुपर टेनच्या कामगिरीच्या जोरावर बंगाल वॉरियर्सचे आव्हान ४७-४४ असे परतवले. पाटणा पायरेट्‌स संघाने सलग तिसऱ्या वर्षी प्रो-कबड्डीच्या अंतिम फेरीत धडक मारली. गेली दोन वर्षे तेच विजेते आहेत. आता शनिवारी (ता. २८) होणाऱ्या अंतिम फेरीत त्यांची गाठ गुजरात फॉर्च्युन सुपर जायंट्‌स संघाशी पडणार आहे.

प्रदीपने चढाई करायची आणि गुण मिळवायचे असे साधे सोपे नियोजन आखत पाटणा पायरेट्‌स संघाने आज येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या बंदिस्त सभागृहात झालेल्या सामन्यात अंतिम फेरीच्या मार्गातील अखेरचा अडथळा सहज पार  केला. चढाईत गुणामागून गुण मिळविणाऱ्या प्रदीपने सामन्यात सर्वाधिक चढाया करत सर्वाधिक (२३) गुण देखील मिळविले. त्याला रोखण्यात आलेले अपयश हेच बंगालच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. एलिमिनेटरच्या पहिल्या सामन्यात एकाच  चढाईत सात, दुसऱ्या सामन्यात एकाच चढाईत चार गुण टिपणाऱ्या प्रदीपचा जणू बंगालच्या बचावपटूंनी धसकाच घेतला होता. याच दडपणाचा बंगालचे खेळाडू सामना करू शकले नाहीत. उत्तरार्धात बंगालच्या मनिंदरने अपेक्षित कामगिरी करताना संघाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. त्याने १६ गुण मिळविले. पूर्वार्धात एक लोण बसल्यानंतर उत्तरार्धात बंगालला आणखी दोन लोण पत्करावे लागले तेव्हाच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. पाटणाने नंतर बदली खेळाडूंना संधी देत विजयाची औपचारिकता पार पाडली. सामना संपता संपता पाटणा संघावर दिलेला लोण ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब ठरली. 

उत्तरार्धात चढायांमध्ये यश मिळवून बंगालने पूर्ण सामन्यात प्रदीपच्या यशानंतरही पाटणावर (३३-२८) असे वर्चस्व राखले. पण, बचावात त्यांना सहन करावी लागलेली पिछाडीच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण  ठरली. पाटणा संघाने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरवात केली. त्यांनी पहिल्या तीन मिनिटांतच बंगालवर लोणला चढवला. त्यामुळे त्यांची सुरवातच दडपणाखाली  झाली. त्या वेळी त्यांच्या नावावर फक्त  एक गुण होता. त्यातच मनिंदर सिंग हा त्यांचा हुकमी चढाईपटू या सामन्यातही अपयशी ठरला. त्याला पूर्वार्धात केवळ तीन गुणांची कमाई करता आली होती. बंगालच्या बचावपटूंनाही प्रदीपला आवरता आले नाही. वर्चस्व राखण्याच्या दृष्टीने जणू प्रदीपच चढाया करणार असे पाटणाचे नियोजन पूर्वार्धात तरी होते. त्यांच्याकडून या सत्रात प्रदीप आणि मोनू गोयत या दोघांनीच चढाया केल्या. बंगालकडून या सत्रात दीपक नरवाल याला माफक यश मिळाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com