अंतिम लढतीनंतर रंगले बाप-बेट्यातील नाट्य

सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

बाप कोण आणि बेटा कोण?
प्रशिक्षकांनी खेळाडूंचा आदर करायचा असतो, हे मनप्रीत विसरला असावा. मेहेर सिंग म्हणाले, ‘‘साखळीत दोन्ही वेळा प्रदीप गुजरात विरुद्ध अपयशी ठरला होता. त्या वेळी मनप्रीतने उसको ‘कहो बाप बाप होता है और बेटा बेटा’ एखाद्या खेळाडूविषयी असे बोलणे योग्य नाही; पण आता मी त्याच्या बाबतीत तेच वाक्‍य बोलतो. पाटणा संघाचा मेंटॉर असताना मनप्रीत तिसऱ्या मोसमात पाटणाचा कर्णधार होता, तर प्रदीपने पदार्पण केले होते. पाटणा जिंकले. प्रदीपचा वाटा मोलाचा होता; पण मनप्रीत अपयशी ठरला होता. नव्या मोसमासाठी फ्रॅंचाईजी त्याला संघात घेण्यास तयारही नव्हते. केवळ माझ्या आग्रहामुळे तो संघात राहिला होता. आम्ही त्याला त्यांची जागा दाखवून दिली.’’

चेन्नई - प्रो-कबड्डी स्पर्धेच्या पाचव्या मोसमाची अखेर पाटणा पायरेट्‌स संघाच्या विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकने झाली असली तरी खरे रंग अंतिम लढतीनंतर रंगलेल्या बाप-बेट्यातील नाट्यामुळे भरले गेले. विजेतेपदाच्या या लढतीनंतर पत्रकार परिषदेत प्रतिस्पर्धी प्रशिक्षकांच्या कलगीतुऱ्यानेच पाचव्या मोसमाची खऱ्या अर्थाने अखेर झाली.

मोसमाच्या साखळीत दोन वेळा पाटणा संघावर विजय मिळविल्यावर पदार्पण करणाऱ्या गुजरात फॉर्च्युन जायंट्‌स संघाचे प्रशिक्षक मनप्रीत सिंग यांना वेगळेच स्फुरण चढले होते. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेतही त्यांचा आवेश तसाच होता. सामना संपल्यावर त्यांचा सगळा आवेश गळून पडला होता; मात्र पाटणा संघाचे प्रशिक्षक राम मेहेर सिंग यांना स्फुरण चढले होते. ‘बाप आणि बेटा’ कोण हा कुत्सित प्रश्‍न उपस्थित करून आम्ही प्रतिस्पर्धी प्रशिक्षकाचा गर्व उतरवला, अशी प्रतिक्रिया मेहेरसिंग यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘‘गुजरात संघ बचावाच्या आघाडीवर निश्‍चितच ताकदवर होता. साखळीत त्यांनी आम्हाला हरवले होते. पहिल्या पराभवाचे आम्हाला काही वाटले नाही; पण दुसऱ्यांदा पराभव झाला तेव्हा तो आमच्या सगळ्यांच्याच जिव्हारी लागला होता. विशेष म्हणजे त्यानंतर मनप्रीत प्रत्येक वेळेस आम्हाला अंतिम लढत पाटणाशीच खेळायची असल्याचे सांगत होते. त्यांना गर्व झाला होता. त्यामुळेच गुजरातविरुद्धच्या त्या दुसऱ्या पराभवाने आमचा विजेतेपदाचा मार्ग लिहिला.’’

काय म्हणाले मनप्रीत?
प्रदीप सर्वोत्तम खेळाडू असल्याचे दाखवून दिले
संपूर्ण स्पर्धेत बचाव आमची ताकद होती. अंतिम सामन्यात आम्ही याच आघाडीवर कमी पडलो
चढाईपटूंसाठी आमच्याकडे चांगले पर्याय होते; पण बचावात आम्ही चौघांवरच अवलंबून होतो
संघात बचावपटू आहेत. अर्थात ते सगळे १८-१९ वयातील आहेत. त्यामुळे आम्ही चौघांच्या अनुभवावर अवलंबून राहिलो
प्रशिक्षक म्हणून मी वैयक्तिक आणि खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी आहे
अंतिम सामन्यात चढाईपटू यशस्वी ठरले. त्यांना बचावाची साथ मिळायला हवी होती
पुन्हा संधी मिळाली, तर सहाव्या मोसमात अशीच कामगिरी करण्याचा विश्‍वास बाळगून आहे.

Web Title: sports news pro kabaddi