पुण्याने रोखला पाटण्याचा विजयरथ

शैलेश नागवेकर
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

उत्तरार्धात प्रदीप नरवालचे झुंजार प्रयत्न अपुरे

लखनौ - कमालीचा समतोलपणा असलेल्या पुणेरी पलटणने यंदाच्या प्रो-कबड्डी स्पर्धेत आमच्यापासून सावध राहा, असा इशारा पुन्हा एकदा दिला. त्यांनी गतविजेत्या आणि आतापर्यंत अपराजित असलेल्या पाटणाचा ४७-४२ असा पराभव केला. प्रो-कबड्डीच्या इतिहासात पुण्याने पाटणाला प्रथमच हरविले आहे.

उत्तरार्धात प्रदीप नरवालचे झुंजार प्रयत्न अपुरे

लखनौ - कमालीचा समतोलपणा असलेल्या पुणेरी पलटणने यंदाच्या प्रो-कबड्डी स्पर्धेत आमच्यापासून सावध राहा, असा इशारा पुन्हा एकदा दिला. त्यांनी गतविजेत्या आणि आतापर्यंत अपराजित असलेल्या पाटणाचा ४७-४२ असा पराभव केला. प्रो-कबड्डीच्या इतिहासात पुण्याने पाटणाला प्रथमच हरविले आहे.

यू मुम्बाला सलामीच्या सामन्यात लीलया हरवून यंदाच्या मोसमाची धडाक्‍यात सुरवात करणाऱ्या पुण्याने आज आपल्या ताकदवर खेळाचे पुन्हा प्रदर्शन केले. पाटण्याची प्रामुख्याने मदार प्रदीप नरवालवर आहे, आज त्याला सुरवातीला रोखण्यात पुण्याने यश मिळवले, त्याच वेळी पुण्याचा संदीप नरवाल प्रभाव पाडत होता. सुपर कॅच होण्याची भीती असताना तो हमखास गुण मिळवत होता. पूर्वार्धात पाच मिनिटांत पुण्याने पाटणावर दोन लोण दिले. तेथेच सामना पुण्याच्या बाजूने झुकला होता.

मध्यांतराच्या २५-१३ अश पिछाडीनंतर पाटण्याला विजयासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागणार हे उघड होते. उत्तरार्धाच्या सुरवातीला पुण्यावर लोण देण्याची त्यांना संधी मिळाली होती; परंतु विष्णू या अखेरच्या खेळाडूने बोनससह दोन गुण मिळवले. अखेर चार मिनिटांनंतर पुण्यावर लोणची संधी पाटण्याने साधली, तरी गुणांमध्ये २०-३० असा फरक होता.

उत्तरार्धात प्रदीप नरवालचे नाणे खणखणीत वाजू लागले. एकूण २४ चढायांत त्याने तब्बल १९ गुणांची कमाई केली, पण त्याच वेळी त्याच्या संघाकडून बचावात चुका होत होत्या. प्रदीपला रोखण्यासाठी पुण्याने बांगलादेशच्या झियाउर रेहमानचे अस्त्र वापरले. पूर्वार्धात तो थेट प्रदीपच्या पायावरच हल्ला करत होता. त्याने सहा गुण मिळवले.

पुण्याकडून चमकले ते राजेश मोंडल आणि संदीप नरवाल हे पूर्वीचे पाटण्याचेच खेळाडू. मोंडलने सुपर टेन, तर संदीपने पाच गुण मिळवले. कर्णधार दीपक हुडानेही नऊ गुणांचे योगदान दिले. अखेरच्या तीन मिनिटांत पाटणाने पुण्यावर लोण दिला, तरीही त्यांना पराभवाचे मळभ दूर करता आले नाही.

यूपीच्या पराभवाची हॅट्ट्रिक
अखेरच्या मिनिटाला लोण स्वीकारावा लागल्यामुळे यूपी योद्धा संघाला घरच्या मैदानावर सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. जयपूर पिंक पॅंथरने हा सामना २४-२२ असा जिंकला. या सामन्यात रेफ्रींचे काही निर्णय यूपीच्या विरोधात गेले. सर्वाधिक किमतीला खरेदी करण्यात आलेला नितीन तोमर आपल्या संघास विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला.

Web Title: sports news pro-kabaddi competition