दिल्लीवरील विजयाने जयपूरला जीवदान

शैलेश नागवेकर
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

रांची - प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात हेलकावे खात असलेल्या जयपूर पिंक पॅंथरने तळाच्या दिल्ली दबंगची शिकार केली आणि आव्हानात नवी ऊर्जा भरली. जसवीरशिवाय खेळतानाही जयपूरने हा सामना ३६-२५ असा जिंकला.

रांची - प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात हेलकावे खात असलेल्या जयपूर पिंक पॅंथरने तळाच्या दिल्ली दबंगची शिकार केली आणि आव्हानात नवी ऊर्जा भरली. जसवीरशिवाय खेळतानाही जयपूरने हा सामना ३६-२५ असा जिंकला.

या विजयानंतरही जयपूर अ गटात पाचव्या स्थानावर आहेत, तर दिल्लीला १२ व्या सामन्यातील सातव्या पराभवास सामोरे जावे लागले. इराणच्या मेराज शेखच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या रमेश भेंडगिरी यांचे मार्गदर्शन लाभत असलेल्या दिल्लीने आजच्या सामन्यातही नीलेश शिंदे आणि बाजीराव होडगे या बचावपटूंना पुन्हा विश्रांती दिली आणि बचावात ते कमी पडले. जयपूरने चढायांत १७; तर दिल्लीने १५ गुण मिळवले; मात्र पकडींमध्ये अनुक्रमे १३-९ हा फरक दोन्ही संघातले अंतर स्पष्ट करणारा होता. दिल्लीची प्रमुख मदार मेराज आणि अबोफझल यांच्यावर होती; पण तेही आज प्रभाव पाडू शकले नाहीत. जयपूरकडून जसवीरची अनुपस्थिती नितीन रावलने भरून काढली. त्याला पवन कुमारने चढायांमध्ये तेवढीच मोलाची साथ दिली.

पाटणाला बंगालने रोखले
प्रदीप नरवालच्या आणखी एक सुपर टेन कामगिरीच्या जोरावर जोमार आगेकूच करत असलेल्या पाटणाला बंगाल वॉरियर्सने ३७-३७ असे बरोबरीत रोखले. पहिल्यापासून पाटणा चार पावले पुढे होते; परंतु अखेरच्या क्षणी बाजी पलटवणाऱ्या बंगालने अखेरच्या चढाईत पाटणावर लोण दिला आणि बरोबरी साधली. पाटणाकडून अर्थातच प्रदीप नरवाल आणि मोनू गोयत यांचा खेळ उल्लेखनीय झाला. बंगालकडून मनिंदर सिंग सामन्यात सर्वाधिक १५ गुण मिळविले. त्याला दीपक नरवालने १० गुणांची साथ दिली.

Web Title: sports news pro-kabaddi competition