हरियानाकडून जयपूरची पकड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

रांची - मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडी या कोपरारक्षकांचे पुनरागमन झाल्यावर प्रो-कबड्डीत पुन्हा एकदा हरियानाची ताकद स्पष्ट झाली. या दोघांना विकासची साथ मिळाली आणि हरियानाने गुरुवारी झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पॅंथर्स संघाचा ३०-२६ असा पराभव केला.

रांची - मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडी या कोपरारक्षकांचे पुनरागमन झाल्यावर प्रो-कबड्डीत पुन्हा एकदा हरियानाची ताकद स्पष्ट झाली. या दोघांना विकासची साथ मिळाली आणि हरियानाने गुरुवारी झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पॅंथर्स संघाचा ३०-२६ असा पराभव केला.

संथ झालेल्या पूर्वार्धात सामना फारसा रंगला नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे फारसे प्रयत्नही झाले नाहीत. त्यामुळे विश्रांतीला १२-१२ अशी माफक बरोबरी राहिली होती. उत्तरार्धात मात्र हरियानाने हळूहळू आक्रमक खेळायला सुरवात केली. नाडा आणि विकासच्या पकडीतून जयपूरच्या चढाईपटूंना सुटता आले नाही. त्याच वेळी वझीर सिंगने आपली चढाईपटूची भूमिका तोख बजावताना दहा गुणांची कमाई केली. हरियानाच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे मोहित आणि नाडाच्या समावेशामुळे त्यांचे खेळाडू कमालीचे आत्मविश्‍वासाने खेळले. त्यातही विकासचा जोश बघता मोहितने एक वेळ विकासला कोपरारक्षकाची जबाबदारी दिली आणि तो त्याच्या हाताशी राहिला. 

जयूपरला पुन्हा एकदा जसवीर सिंगची उणिव भासली यात शंका नाही. उर्वरित कार्यक्रम लक्षात घेता त्याला विश्रांती देण्याचे संघाचे नियोजन असावे. पण, याचा फटका त्यांना बसला. त्याच्या गैरहजेरीत चढाईत हमखास गुण आणणाऱ्या चढाईपटूची कमतरता त्यांना जाणवली. त्यातच कर्णधार मनजित चिल्लरची नेहमीप्रमाणे मोक्‍याच्या वेळी घाई करण्याची चूक या वेळीही त्यांना महागात पडली. त्यामुळे पूर्वार्धात सामना ताणून खेळल्यानंतरही उत्तरार्धात त्यांना सामना गमवावा लागला.

पाटणाचा पराभव
घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात पाटणा पायरेट्‌सला पराभवाचा सामना करावा लागला. नितीन तोमर आणि रिशांक देवाडिगा यांच्या खोलवर चढायांनी पाटणाचा बचाव खिळखिळा केला आणि ४६-४१ असा विजय मिळविला. पाटणाचा प्रदीप नरवाल आणि यूपीचे नितीन तोमर, रिशांक देवाडिगा अशा चढाईपटूंमध्येच हा सामना रंगला. पूर्ण सामन्यात नोंद झालेल्या एकूण ८७ गुणांपैकी केवळ १४ गुण हे पकडीचे होते. यावरूनच या सामन्यात चढाया किती निर्णायक ठरल्या याचा अंदाज येईल. तोमरने १८ आणि देवाडिगाने ११, तर प्रदीप नरवालने १३ गुण नोंदवले. म्हणजेच चढाईतील एकूण ७३ गुणांपैकी तब्बल ४२ गुण या तिघांचेच होते.

Web Title: sports news pro-kabaddi competition