पुणे जिल्हा कॅरम संघटनेच्या अस्तित्वाबाबत संभ्रमावस्था

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

राज्य संघटनेकडून संलग्नत्व रद्द करण्याची कारवाई

पुणे - पुणे जिल्हा कॅरम संघटनेची वार्षिक निवडणूक तोंडावर असताना ती नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेने पुणे जिल्हा संघटनेचे संलग्नत्वच रद्द करण्याची कारवाई केल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्य संघटनेकडून संलग्नत्व रद्द करण्याची कारवाई

पुणे - पुणे जिल्हा कॅरम संघटनेची वार्षिक निवडणूक तोंडावर असताना ती नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेने पुणे जिल्हा संघटनेचे संलग्नत्वच रद्द करण्याची कारवाई केल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे जिल्हा कॅरम संघटना बरखास्त करण्यात आल्याचे राज्य कॅरम संघटनेच्या वतीने बुधवारी कळवण्यात आले. पुणे जिल्हा कॅरम संघटना ही धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असताना राज्य संघटना ती बरखास्त कशी करू शकते, असे राज्य संघटनेचे सचिव अरुण केदार यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘नक्कीच हा अधिकार धर्मादाय आयुक्तांचा आहे. आम्ही त्यांचे संलग्नत्व रद्द करत आहोत. पुणे जिल्ह्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील शंभरहून अधिक खेळाडूंनी लेखी तक्रार आमच्याकडे केल्यामुळे आम्ही निवडणूक लोकशाही पद्धतीने व्हायला हवी, असे आमचे मत आहे. पण,  ती होत नसल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले.’’

पुणे जिल्हा कॅरम संघटनेची वार्षिक निवडणूक रविवारी २३ जुलै रोजी होत असून त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. राज्य कॅरम संघटनेने पुणे जिल्ह्याचे काम पाहण्यासाठी भरत देसडला, चंद्रशेखर आजबे, आशुतोष धोडमिसे आणि अजित सावंत यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक प्रक्रिया लागू झाल्यामुळे पुणे जिल्हा संघटनेवर पदाधिकारी नाहीत. अशा वेळी समिती कशी नियुक्ती केली जाऊ शकते. तसेच समितीमधील देसडला आणि आजबे यांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचे समोर आले आहे. राज्य संघटनेकडून करण्यात आलेले आरोप पुणे जिल्हा संघटनेने फेटाळले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा संघटनेच्या अस्तित्वाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सूड भावनेने केलेली कारवाई - तोरवे
आम्ही सर्व घटना आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करत असल्याचे सांगून पुणे जिल्हा कॅरम संघटनेचे एक पदाधिकारी सुभाष थोरवे यांनी आमच्यावर सूड भावनेने ही कारवाई केल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्ही आमची सर्व प्रकिया राज्य कॅरम संघटनेला ई-मेलद्वारे कळविली आहे. धर्मादाय आयुक्ताकडे आमचे सर्व लेखापरीक्षण अहवाल सादर केलेले आहेत. त्याची पोचपावतीदेखील आमच्याकडे आहे. आम्ही घटनेनुसारच सर्व प्रक्रिया राबवत आहोत. त्यामुळे आमची निवडणूक ही ठरल्याप्रमाणे होणारच.

Web Title: sports news pune district carrom organisation