बचावलेली सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

बचावलेली सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

मुंबई - ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीयांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य असलेल्या पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला खरा; पण तिला सलग दुसऱ्या दिवशी खडतर केलेल्या लढतीस सामोरे जावे लागले. सिंधूची लढत सुरू असताना गुरू गोपीचंद यांच्या चेहऱ्यावरील वाढता तणावच ऑलिंपिक, तसेच जागतिक उपविजेतीचा खेळ अपेक्षित नसल्याचे दाखवणारा होता.

पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीतील भारताचे आव्हान राखले आहे. तिने थायलंडच्या निचॉन जिंदापॉल हिचे खडतर आव्हान २१-१३, १३-२१, २१-१८ असे परतवले. तब्बल ६६ मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूच्या खेळात सातत्याचा अभाव होता. आपली प्रतिस्पर्धी थकली असल्याचे सिंधूने जाणले. सिंधूही थकली होती; पण तिने आपण दीर्घ लढतीसाठी तयार आहोत, असेच दाखवले. त्यामुळे प्रतिस्पर्धीचा खेळ खच्ची झाला आणि कमी चुका करणाऱ्या सिंधूची सरशी झाली. 

पहिला गेम जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्ये तिची आठ गुणांची पिछाडी अपेक्षितच नव्हती; पण हे घडत होते. तिचा भर जास्त आक्रमणावर होता. खरे तर सिंधूचा खेळ प्रतिस्पर्ध्याला आपल्या फसव्या रॅलीजनी चकवण्याकडे जास्त कल असतो; पण हे तिच्याकडून क्वचितच दिसले. तिने प्रखर जिद्दीच्या जोरावरच ही लढत जिंकली.

किदांबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसरा क्रमांक मिळविला आहे. सिंगापूर विजेता बी. साई प्रणीत बारावा आहे; तर एचएस प्रणॉय सोळावा. समीर वर्मा (३६) आणि पारुपली कश्‍यप (४१) हे अव्वल पन्नासमध्ये आहेत.

सिंधूची पुढील लढत ओकुहाराविरुद्ध?
खरे तर आक्रमक वेगवान प्रत्युत्तर सिंधू देत असते; पण या वेळी तिच्या कोर्टवरील हालचाली वेगवान नव्हत्या. कदाचित ती पहिल्या फेरीतील अनपेक्षित दीर्घ लढतीतून पूर्ण सावरली नसावी; मात्र आता तिला आगामी लढतीसाठी जास्त संधी नसेल. तिची लढत जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध होण्याची शक्‍यता आहे.सिंधूचा प्रतिकार असतो हे तिने दाखवले. सदोष खेळानंतरही त्यामुळेच ती कौतुकास पात्र ठरते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com