कबड्डी मैदानावरचे पदाधिकारी रमेश देवाडीकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

मुंबई - महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी सरचिटणीस रमेश देवाडीकर (वय ६६) यांचे शनिवारी (ता. २९) पहाटे हृदयविकाराच्या झटक्‍याने झोपेतच निधन झाले. देवाडीकर पदाधिकारी असले तरी मैदानात जास्त काम करणारे होते. त्यामुळेच मातीशी तसेच कबड्डीशी इमान राखणारा संघटक हरपला, अशीच हळहळ व्यक्त केली जात होती.

देवाडीकर यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चांगली नव्हती. तरीही ते नियमित डोंबिवलीहून राज्य कबड्डी संघटनेच्या दादर येथील कार्यालयात येत होते. शुक्रवारीही ते दादर कार्यालयात आले होते. कबड्डी हाच त्यांचा श्‍वास होता; तसेच ध्यासही. डोंबिवलीच्या छत्रपती मंडळाचे ते संस्थापक होते. घेतलेलीच नव्हे तर देण्यात आलेली जबाबदारी पूर्णत्वास नेण्याच्या त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते ‘कबड्डीमहर्षी’ बुवा साळवी यांच्या नजरेत भरले. त्यांनी बुवांबरोबर अनेक वर्षे राज्य संघटनेचे संयुक्त कार्यवाह म्हणून काम पाहिले. ते काही वर्षांपूर्वी राज्य कबड्डी संघटनेच्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आले; पण ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीतील पराभवामुळे त्यांना पद सोडावे लागले होते.

देवाडीकर यांनी कबड्डीच्या प्रसार तसेच प्रचाराकरिता अनेक उपक्रम राबवले. पहिला कबड्डी दिन डोंबिवलीत साजरा झाला. एकंदर तीन कबड्डी दिन तिथे झाले. अनेक स्पर्धा आयोजनात त्यांचा मोलाचा सहभाग होता. आज संध्याकाळी डोंबिवली पूर्व येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी  अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसह अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: sports news ramesh dewadikar