रवी शास्त्रींचेच पारडे जड

पीटीआय
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ‘बीसीसीआय’ची नियुक्त सल्लागार समिती केवळ सहा जणांच्याच मुलाखती घेणार असून, यात माजी संघ संचालक रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात आहे. 

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ‘बीसीसीआय’ची नियुक्त सल्लागार समिती केवळ सहा जणांच्याच मुलाखती घेणार असून, यात माजी संघ संचालक रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात आहे. 

या पदासाठी ‘बीसीसीआय’केड शास्त्री यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पिबस, डोड्डा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्‍लुसनेर, राकेश शर्मा (ओमानचे प्रशिक्षक), फिल सिमन्स या क्रिकेटमधील व्यक्तींसह नाशिकचे अभियंता उपेंद्रनाथ ब्रह्मचारी असे दहा जणांचे अर्ज आले. निवड समिती यापैकी सहा जणांचीच मुलाखत घेणार असून, यात शास्त्री, सेहवाग, मूडी, सिमन्स, पिबस, राजपूत यांच्या समावेशाची शक्‍यता आहे. क्‍लुसनेर यांचे नाव राखीव यादीत ठेवले जाण्याची शक्‍यता आहे. 

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा एक वर्षाचा करार संपल्यानंतर अनिल कुंबळे यांनी विंडीज दौऱ्यातूनच या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. कुंबळे आणि कोहली यांच्यातील कथित अंतर्गत संघर्षानंतर या वेळी नव्या प्रशिक्षकाची मुदत दोन वर्षांची ठेवली जाईल. 

शास्त्रींची उडी
प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री कधीच नव्हते. जेव्हा ‘बीसीसीआय’ने अर्ज पाठविण्याची मुदत वाढवून दिली, तेव्हा त्यांनी अर्ज भरला. शास्त्री यांनी अर्ज भरल्यापासून त्यांचेच पारडे जड मानले जाऊ लागले. कर्णधार कोहलीबरोबर त्यांचा जुळून आलेला समन्वय हे त्यामागचे प्रमुख कारण ठरू शकते. अर्थात, शास्त्री यांच्या नावाला गांगुली किती पाठिंबा देतात, यावर बरेच काही अवलंबून राहील. यापूर्वी प्रशिक्षकपदासाठी झालेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी स्काइपवरून दिलेल्या मुलाखतीला गांगुली यांनी आक्षेप घेतला होता. शास्त्री या पदासाठी गंभीर असतील तर त्यांनी मुलाखतीला यायला हवे, असे गांगुली म्हणाले होते; पण या वेळी परदेशी उमेदवारांच्या मुलाखती या अशाच पद्धतीने होणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: sports news Ravi Shastri cricket