वाळूच्या ट्रॅकवर लागणार रायडर्सची कसोटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

कोईमतूरला आम्ही जोकर लेनचा प्रयोग केला. त्यास रायडर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे येथेही जोकर लेन तयार केली आहे. 
-श्‍याम कोठारी

पुणे - एमआरएफ मोग्रीप-एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेतील तिसरी फेरी जयपूर येथे रविवारी (ता. २४) होईल. मानसरोवर येथील वाळूच्या ट्रॅकवर रायडर्सची कसोटी लागेल. जोकर लेनचा समावेश, टीव्हीएस रेसिंग संघाच्या दुसऱ्या फळीतील सर्व प्रमुख रायडरचा सहभाग तसेच स्थानिक गटाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे या स्पर्धेची रंगत वाढली आहे.

मालिकेचे प्रवर्तक असलेल्या पुणेस्थित गॉडस्पीड रेसिंगचे संस्थापक प्रमुख श्‍याम कोठारी यांनी सांगितले की, याशिवाय वाळूचा ट्रॅक आव्हानात्मक असेल. एरवी मातीचा ट्रॅक पाणी मारल्यामुळे कठिण असतो. अशा ट्रॅकच्या वळणांवर वेगाने येऊन ब्रेक मारावा लागतो. वाळूच्या ट्रॅकवर मात्र वेग कमी केल्यास बाईक अडकते. त्यामुळे वेग वाढवत वळण घ्यावे लागते. त्याचवेळी बाईकचे संतुलनही साधावे लागते.

ट्रॅक ७५० मीटर अंतराचा आहे. त्यात १२ डबल टम्प, एक कट टेबलटॉप, एक टेबलटॉप, व्हूप्ज डी डूज आणि बर्म्स असे अडथळे आहेत. 

Web Title: sports news Riders test for sand track

टॅग्स