‘अर्जुन’वरून रोहन बोपण्णाचा ‘आयटा’वर तीर

पीटीआय
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने ‘आयटा’विषयीचा संताप व्यक्त केला.

नवी दिल्ली - दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने ‘आयटा’विषयीचा संताप व्यक्त केला.

आपला अर्ज निर्धारित मुदतीत पाठविला नाही, असा बोपण्णाचा मुख्य आक्षेप आहे. २८ एप्रिल रोजी ही मुदत उलटून गेली. त्यानंतर बोपण्णाने फ्रेंच ओपनमध्ये कॅनडाची जोडीदार गॅब्रिएला डॅब्रोस्की हिच्या साथीत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविले. त्यानंतर १४ जून रोजी त्याचे नाव पाठविण्यात आले. पुरस्कार निवड समितीने निर्धारित मुदतीत आलेल्या अर्जांचाच विचार केला. त्यामुळे साकेतला पसंती मिळाली. यापूर्वी बोपण्णाचे नाव अनेक वेळा पाठविण्यात आले; पण ते नाकारण्यात आले.

या पार्श्‍वभूमीवर बोपण्णाने ‘आयटा’चा स्पष्ट उल्लेख केला. तो म्हणाला, की ‘आम्ही व्यावसायिक टेनिसपटू आहोत. देशाचा लौकिक उंचावण्यासाठी आम्ही खूप काही पणास लावतो. आमच्या निष्ठेविषयी कुणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही; पण ‘सिस्टिम’ (या संदर्भात संघटना) ठिसाळ कारभार करते तेव्हा आमचा अनादर होतोच; पण उचित बहुमान मिळण्याची आशाही धुळीस मिळते. माझे नाव निर्धारित मुदतीत पाठविले नाही. यावरून ‘आयटा’मध्ये व्यावसायिकता आणि सक्षम कारभाराचा अभाव दिसतो. पूर्वीसुद्धा माझ्या बाबतीत असे घडले. त्या वेळीसुद्धा संघटना माझ्या पाठीशी उभी राहिली नाही.’

साकेतचे कौतुक
बोपण्णाने सांगितले की, ‘मी याप्रसंगी साकेतचे अभिनंदन करू इच्छितो. मला फार अभिमान वाटतो, कारण त्याने खेळाडू म्हणून केलेली प्रगती आणि एक माणूस म्हणून त्याने आज जे काही साध्य केले आहे ते मी पाहिले आहे.’

कामगिरीतील फरक
निवड समितीने जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ दरम्यानच्या कामगिरीचा विचार केला. यात बोपण्णाने व्यावसायिक टेनिसपटू म्हणून ‘टूर’वर लक्षवेधी कामगिरी केली; पण देशासाठी बहुविध क्रीडा स्पर्धांत तो असे यश मिळवू शकला नाही. त्याने जुलै २०१३ मध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकापर्यंत भरारी घेतली. नऊ एटीपी विजेतिपदे त्याने पटकावली. यात २०१५च्या माद्रिद मास्टर्स जेतेपदाचा समावेश आहे. देशासाठी खेळताना मात्र रिओ ऑलिंपिकमध्ये तो सानिया मिर्झासह मिश्र दुहेरीत ब्राँझपदक जिंकू शकला नाही. या जोडीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यानंतरही ऑलिंपिकमुळे ‘आयटा’ त्याचा अर्ज पाठवू शकली असती; पण तसे झाले नाही.

दुसरीकडे साकेतला ‘टूर’वर फारशी भरीव कामगिरी करता आली नाही; पण त्याने २०१४ च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके मिळविली. सानिया मिर्झासह तो मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, तर सनम सिंग याच्या साथीत त्याने दुहेरीत रौप्यपदक जिंकले. केंद्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी ऑलिंपिक, आशियाई अशा स्पर्धांतील पदकासाठी जास्त गुण मिळतात. साकेतला त्यामुळेच झुकते माप मिळाले. 

दुसरीकडे बोपण्णाने इंचॉनमधील स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याला ‘टूर’वरील स्पर्धांत गुण राखायचे होते. त्यामुळे त्याच्यासह काही वरिष्ठ खेळाडूंना या स्पर्धेतून माघार घेण्याची परवानगी ‘आयटा’ने दिली होती.

Web Title: sports news Rohan Bopanna