कर्णधार रोहित शर्माचे अपयश भारतीय संघासाठी चिंताजनक

पीटीआय
बुधवार, 14 मार्च 2018

कोलंबो - श्रीलंकेतील तिरंगी टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताचा बुधवारी अखेरचा साखळी सामना होत आहे. बांगलादेशविरुद्धची ही लढत जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर गाडी रुळावर आलेली असली, तरी कर्णधार रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ चिंता निर्माण करणारा आहे.

या स्पर्धेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाचा भर नवोदितांवर आहे. रोहित, शिखर धवन आणि सुरेश रैना हे अनुभवी खेळाडू आहेत; परंतु धवनचा अपवाद काही प्रमाणात वगळता रोहितसह रैनानेही निराशा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मनीष पांडे आणि दिनेश कार्तिक फलंदाजीत भरवसा दाखवत आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध सोमवारी विजय मिळवता आला.

गोलंदाजीतही अनुभव कमी असला, तरी प्रगती झाली आहे. यामध्ये शार्दुल ठाकूर आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात एकाच षटकात २७ धावा त्याने दिल्या होत्या. कालच्या सामन्यात चार षटकांत २७ धावा देत चार विकेट मिळवल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात तो ‘सर्वोत्तम खेळाडू’ ठरला होता. 

भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवला असला, तरी याच बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध २००च्या पलीकडचे आव्हान पार केले होते. त्यामुळे बांगलादेशला गृहीत धरण्याची चूक भारत करणार नाही. मुशफिकउर रहिम याच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अंतिम फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी बांगलादेशसाठीही हा सामना महत्त्वाचा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news rohit sharma cricket india T-20