सतत खेळल्यास यश कसे मिळणार - साईना नेहवाल

सतत खेळल्यास यश कसे मिळणार - साईना नेहवाल

नवी दिल्ली - जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या नव्या कार्यक्रमावर साईना नेहवालने शाब्दिक स्मॅश केले. लागोपाठ स्पर्धा असल्यास त्यात केवळ सहभागी होता येईल, जिंकता येणार नाही, अशा शब्दांत तिने बॅडमिंटन कार्यक्रमावर टीका केली.

जागतिक बॅडमिंटन महासंघाने नव्या वर्षात बारा स्पर्धा खेळण्याची सक्ती केली आहे. त्याशिवाय भारतीयांना आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाही आहेत. जागतिक कार्यक्रम खूपच भरगच्च आहे. तो आघाडीच्या खेळाडूंसाठी योग्य नाही. माझी सर्वोत्तम कामगिरी होण्यासाठी मला पुरेशा ब्रेकची गरज असते. सलग स्पर्धा खेळणे मला जमत नाही. त्यात मी सहभागी होईन, पण जिंकणार नाही, असे साईनाने सांगितले.

आता आमचा कार्यक्रम बघा. बॅडमिंटन लीग संपल्यावर सलग तीन स्पर्धा आहेत. जागतिक स्पर्धा कोणत्याही स्पर्धेच्या कितीतरी पट दमछाक करते. त्यापूर्वी तीन सुपर सीरिज स्पर्धा आहेत. हा असा कार्यक्रम का तयार केला हेच कळत नाही. हे केवळ आव्हानात्मकच नाही, तर चांगलेच थकवणारेही आहे, असे माजी ऑलिंपिक ब्राँझपदक विजेतीने सांगितले.

या स्पर्धेत कामगिरी कशी होणार, मी किती तग धरू शकणार याबाबत आताच काहीही सांगता येणार नाही. माझे महत्त्व फिटनेसला असेल. त्यामुळे स्पर्धेतील कामगिरी कशी होते याचा मी विचार करणार नाही. माझ्यासाठी स्पर्धांपेक्षा तंदुरुस्ती महत्त्वाची असेल असे तिने सांगितले. आता बॅडमिंटन टेनिससारखे करण्याचा विचार असेल, तर त्यांनीही चार ते पाच स्पर्धा ग्रॅड स्लॅमसारख्या करायला हव्या होत्या. त्यात जास्त पैसाही असता. मी जागतिक महासंघाची अध्यक्षा असते तर हेच केले असते, जास्त बक्षीस रकमेचे स्वागत आहे, पण एवढ्या स्पर्धा, काहीच कळत नाही.

भारतीयांना या भरगच्च कार्यक्रमाबरोबरच राष्ट्रीय स्पर्धाही खेळायची आहे. ही स्पर्धा तीन दिवसांचीच असेल. त्याने फारसा फरक पडत नाही; पण राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक स्पर्धा यात शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक तंदुरुस्तीचाही कस लागतो. या स्पर्धेपूर्वी दुखापतीतून सावरण्यास पुरेसा वेळ हवा, पण तोच नेमका नाही. यामुळे माफक दुखापतीही गंभीर होण्याचा धोका आहे, असेही तिने सांगितले.

नव्या वर्षातील बॅडमिंटन स्पर्धा कार्यक्रम क्रेझीच आहे. या एवढ्या स्पर्धा खेळण्याचेच आव्हान आमच्यासमोर असेल. नवा सर्व्हिस नियम तर स्टुपिड आहे. त्याचा उंच खेळाडूंना तर खूपच त्रास होईल.
- कॅरोलिना मरीन, ऑलिंपिक विजेती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com