साईनाची हार, श्रीकांत बचावला

पीटीआय
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई/लंडन - साईना नेहवालला तई झू यिंगविरुद्धचा पाच वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवण्यात ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतही अपयशच आले. किदांबी श्रीकांतने मात्र अडखळत का होईना विजय मिळवत यंदाच्या स्पर्धेतील भारतीयांचा पहिला विजय मिळविला. पी.व्‍ही. सिंधू हिलासुद्धा झगडावे लागले. 

मुंबई/लंडन - साईना नेहवालला तई झू यिंगविरुद्धचा पाच वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवण्यात ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतही अपयशच आले. किदांबी श्रीकांतने मात्र अडखळत का होईना विजय मिळवत यंदाच्या स्पर्धेतील भारतीयांचा पहिला विजय मिळविला. पी.व्‍ही. सिंधू हिलासुद्धा झगडावे लागले. 

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या तई झु हिने साईनाचा २१-१४, २१-१८ असा पराभव केला. साईना दोन गेममध्येच पराजित झाली असली, तरी सर्वच काही निराशाजनक नव्हते. यापूर्वीच्या लढतींच्या तुलनेत तिचा खेळ चांगला झाला. हालचाली काहीशा वेगवान होत्या; तसेच तिने प्रसंगी गुडघ्यावर जास्त ताण देत झुकत शटल चांगल्याप्रकारे परतवले; पण तरीही ती तई झुविरुद्धचा २०१३ पासूनचा विजयाचा दुष्काळ संपवू शकली नाही. 

श्रीकांतने फ्रान्सच्या ब्राईस लेवेर्देझ याचा पहिला गेम एकतर्फी गमावल्यावर ७-२१, २१-१४, २२-२० असा पराभव केला. ब्राईसने गतवर्षी जागतिक स्पर्धेत ली चाँग वेई याला पराजित केले होते, त्यामुळे श्रीकांतसमोरील आव्हान सोपे नव्हते. त्यातच गतवर्षी या स्पर्धेत सलामीच्या फेरीत पराजित झाल्याचे दडपणही त्याच्यावर होते; पण आता हा अडथळा दूर केल्यामुळे त्याचा खेळ आगामी लढतीत बहरण्याची आशा आहे. 

श्रीकांतच्या खेळात कमालीचे चढ-उतार होते. निर्णायक गेममध्ये ११-६ या मोठ्या आघाडीनंतर तो मोक्‍याच्या वेळी १८-१९ असा मागे पडला; मात्र भारतीय चाहत्यांची निराशा त्याने टाळली. याचे श्रेय त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांना द्यायला हवे. ब्राईस मोक्‍याच्या वेळी संयम राखू शकला नाही, गुण जिंकण्यासाठी जास्तच आतूर झाला आणि ते श्रीकांतच्या पथ्यावर पडले.

सिंधूचा संघर्षपूर्ण विजय
साईना नेहवालचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलेले असताना पी. व्ही. सिंधूलाही पहिल्या फेरीसाठी झुंझावे लागले. सिंधूने चोंचुवाँग पोर्मपॉवीविरुद्धचा हा सामना २०-२२, २१-१७, २१-९ असा जिंकला. पहिला गेम गमावल्यावर भारतीय पाठीराख्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. दुसऱ्या गेमध्येही मिळविलेली आघाडी फार मोठी नव्हती, परंतु हा गेम जिंकल्यानंतर सिंधूने मागे वळून पाहिले नाही.

भारताचे अन्य निकाल 
एकेरी ः सोन वॅन हो (कोरिया) वि.वि. बी. साईप्रणित १३-२१, २१-१५, २१-११,
मिश्र दुहेरी ः प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी वि.वि. मार्विन एमिल सिएडेल-लिंडा ईफ्लेर २१-१९, २१-१३, महिला दुहेरी ः शिहो तनाका-कोहारू योनेमोटो (जपान) वि.वि. जे. मेघना-पूर्विशा एस. राम २१-१४, २१-११, मिसाकी मात्सुमोटो-आयाका ताकाहासी (जपान) वि.वि. अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी २१-१४, २१-१३, पुरुष दुहेरी ः मार्क्‌स एलिस-ख्रिस लॅंग्रिज (इंग्लंड) वि.वि. मनु अत्री-बी. सुमीथ रेड्डी २२-२०, २१-१२.

Web Title: sports news saina nehwal Kidambi Srikanth badminton