साईना नेहवालच अखेर राष्ट्रीय चॅंपियन

साईना नेहवालच अखेर राष्ट्रीय चॅंपियन

नागपूर - आंतरराष्ट्रीय स्तरावर पी. व्ही. सिंधू सहकारी साईना नेहवालच्या एक पाऊल पुढे असली, तरी  बुधवारी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावून राष्ट्रीय पातळीवर आपणच सर्वोत्तम असल्याचे साईना नेहवाले सिद्ध केले. रंगतदार झालेल्या ५४ मिनिटांच्या लढतीत साईनाने दोन गेममध्ये पी. व्हि. सिंधूचे आव्हान २१-१७, २७-२५ असे परतवून लावले. पुरुष विभागात एच. एस. प्रणॉयने अव्वल मानांकित किदांबी श्रीकांतला धक्का देत विजेतेपद मिळविले. 

येथील विभागीय क्रीडा संकुलात अखेरच्या दिवशी पाच अंतिम लढती झाल्या, तरी सर्वांना कुतूहल महिला एकेरीतील सिंधू-साईना यांच्यातील अंतिम लढतीचे होते. महिलांच्या अंतिम लढतीबद्दल ताणलेली उत्सुकता या दोघींमधील संघर्षाने अधिकच ताणली गेली होती. साईनाने पहिली गेम २० मिनिटांत जिंकली; पण सिंधूने दुसऱ्या गेममध्ये आपल्या चपळपणाबरोबर वेगवान फटक्‍यांनी साईनाचा कस पाहिला. दुसऱ्या गेममध्ये सातत्याने आघाडीवर असणारी सिंधू अखेरच्या क्षणी २१-२० अशी आघाडीवर होती; मात्र तिला गेम पॉइंट साधता आला नाही. साईनाने नंतर दाखवलेला संयम निर्णायक ठरला. त्यामुळेच पाच मॅच पॉइंट गमाविल्यानंतरही साईनाची एकाग्रता ढळली नव्हती. साईनाने प्रदीर्घ रॅलीनंतर सहावा मॅच पॉइंट वाचवत तिसऱ्या राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. 

प्रणॉय सरस
पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयने धक्‍कादायक निकाल नोंदविला. त्याने तीन गेम्सपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीकांतचा २१-१५, १६-२१, २१-७ असा पराभव केला. हा सामना ५० मिनिटे चालला. पहिल्या दोन गेममध्ये दोन्ही खेळाडूंकडून जबरदस्त खेळाचे प्रदर्शन झाले. त्यामुळे एकेक गेमच्या बरोबरीनंतर तिसरी गेम रंगणे अपेक्षित होते; मात्र प्रणॉयने आपल्या शारीरिक क्षमतेचा अचूक उपयोग करून घेत कमामलीचा वेगवान खेळ केला. श्रीकांतच्या हालचालीही काहीशा मंदावल्या होत्या. प्रणॉयने ही संधी साधून निर्णायक गेममध्ये श्रीकांतला संधीच दिली नाही. 

अंतिम निकाल - दुहेरी - पुरुष - मनू अत्री-बी. सुमीथ रेड्डी वि.वि. सत्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी १५-२१, २२-२०, २५-२३, महिला - अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी वि.वि. संयोगित घोरपडे-प्राजक्ता सावंत २१-१४, २१-१४, मिश्र - सत्विकसाईराज रंकीरेड्डी-अश्‍विनी पोनप्पा वि.वि. प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी २१-९, २०-२२, २१-१७

श्रीकांतविरुद्ध मिळविलेला विजय आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा व अस्मिरणीय विजय आहे. दोघांनाही एकमेकांच्या खेळाची चांगली ओळख होती. दडपण न घेता सकारात्मक खेळ केल्याने विजय मिळवू शकलो.
- एच. एस. प्रणॉय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com