राष्ट्रीय शिबिरात जाण्यास संजीवनी जाधवचा नकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

मुंबई/गुंटूर - विविध ॲथलेटिक्‍स स्पर्धांत सातत्याने यश मिळवल्यानंतरही संजीवनी जाधवने राष्ट्रीय शिबिराऐवजी आपल्या मार्गदर्शकांसोबतच राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रता गाठण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.

मुंबई/गुंटूर - विविध ॲथलेटिक्‍स स्पर्धांत सातत्याने यश मिळवल्यानंतरही संजीवनी जाधवने राष्ट्रीय शिबिराऐवजी आपल्या मार्गदर्शकांसोबतच राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रता गाठण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.

बेलारूसचे निकोलाय स्नेसारेव यांची भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाने मध्यम पल्ल्याच्या शर्यतीसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. ते संजीवनीने राष्ट्रीय शिबिरात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहेत; पण संजीवनीने यास नकार दिला आहे. ‘‘तीन वर्षांपासून निकोलाय सर राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्यासाठी आग्रह करीत आहेत. मात्र माझे मार्गदर्शक विजेंदरसिंग हे मला झेपेल त्याचवेळी प्रगती होईल, यानुसार मार्गदर्शन करीत आहेत. ते प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा मला फायदा होत आहे. राष्ट्रीय शिबिरात गेल्यास तिथे जास्त ताण येईल आणि मला दुखापत होण्याचीही शक्‍यता आहे,’’ असे संजीवनीने 
सांगितल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रीय शिबिरातील स्पर्धकांनाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा; तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पात्रता स्पर्धा शर्यतीत सहभागी होता येईल, असा भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाचा नियम सांगतो. ‘‘मी याचा जास्त विचार करीत नाही. आशियाई स्पर्धेपूर्वीही त्यांनी हेच सांगितले होते; पण ते काही अमलात आले नव्हते. अनेक ॲथलिट वैयक्तिक मार्गदर्शकांबरोबर सराव करीत आहेत. मी पात्रता कामगिरी केली तर भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघ माझ्यावर अन्याय करणार नाही, हा मला विश्‍वास आहे,’’ असेही संजीवनीने सांगितल्याचे बातमीत म्हटले आहे.

Web Title: sports news Sanjivani Jadhav refuses to attend national camp