सतीशकुमारला नुकसानभरपाई देण्याचा आदेश

पीटीआय
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजक घेत असल्याचा गैरसमज करून २००२ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागापासून वंचित ठेवण्यात आलेल्या कुस्तीगीर सतीश कुमारला नुकसान भरपाई म्हणून २५ लाख रुपये देण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रविवारी भारतीय कुस्ती महासंघाला दिला.

नवी दिल्ली - कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजक घेत असल्याचा गैरसमज करून २००२ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागापासून वंचित ठेवण्यात आलेल्या कुस्तीगीर सतीश कुमारला नुकसान भरपाई म्हणून २५ लाख रुपये देण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रविवारी भारतीय कुस्ती महासंघाला दिला.

सतीशकुमारच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने भारतीय क्रीडा संघटनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरेदेखील ओढले. ‘खेळाशी संबंध नसलेल्या व्यक्तींच्या हातात क्रीडा संघटना असल्यामुळे अशा प्रकारे खेळाडूच्या कारकिर्दीशी खेळले जात असल्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पदकापासून वंचित रहावे लागत आहे,’ असा शेरा उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात मारला आहे. 

या प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाला दोषी धरतानाच अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुरिंदर एस. राठी यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला या प्रकरणात सहभागी असलेल्या कुस्ती महासंघातील प्रत्येक पदाधिकाऱ्याची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याबाबत काळजीदेखील घेण्याच्या सूचना करण्यात आली आहे.

नेमके काय घडले
बुसान येथे होणाऱ्या १४व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून सतीशकुमारची निवड. संघ कोरियाला रवाना होत असतानाच त्याला विमानतळावरच जाण्यापासून रोखण्यात आले. त्या वेळी सतीशकुमार उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्याचे सांगण्यात आले. अर्थात, नेमका सतीशकुमार कोण हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. संघात निवड झालेला सतीशकुमार पंजाबचा, तर दुसरा सतीशकुमार हा पश्‍चिम बंगालचा होता. त्यानंतर बंगालच्या सतीशकुमारवर या प्रकरणात दोन वर्षांची बंदी लादण्यात आली. 

न्यायालयाचे ताशेरे 
याप्रकरणी नंतर सतीशकुमारने न्यायालयाची पायरी चढली होती. त्याच्या याचिकेवर निर्णय देताना आपल्या ३० पानी आदेशात न्यायालय म्हणते, ‘‘जे कुस्तीगीर देशासाठी सर्वस्व पणाला लावण्यास तयार असतात, अशा कुस्तीगीरांची महासंघाकडून काळजी घेतली जात नाही. दोन सतीशकुमार असताना नेमका कोण, हे स्पष्ट झाल्याशिवाय त्यांनी सतीशकुमारला कसे रोखले. हे सर्व पूर्वग्रहदूषित वाटते. खेळाडूंचा  अवमान होत असेल, तर भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा पुढे जाईल?’’

महासंघावर टीका
हे प्रकरण बघता भारतीय कुस्ती महासंघ जणू ‘एका डोळ्याने झोपले’ आहे असेच वाटते. दोषी सतीशकुमार कोण? हे त्यांना समजू नये, हे आश्‍चर्यच आहे. विशेष म्हणजे अन्याय झालेला सतीशकुमार ९७ किलो वजनी गटातील आणि दोषी सतीशकुमार ५७ किलो वजनी गटातील असताना हा फरकसुद्धा महासंघाला समजू नये हे पटत नाही. त्यामुळेच हे सर्व जाणूनबुजून केल्यासारखेच वाटते.’’

Web Title: sports news satishkumar court