दुसऱ्या विजयासह भारत गटामध्ये अव्वल स्थानी

मुकुंद धस
बुधवार, 26 जुलै 2017

श्रीलंकेवर सहजगत्या विजय

बंगळूर - यजमान भारताने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना गटात अव्वल स्थान पटकावले. कांतिरवा बंदिस्त क्रीडासंकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत मंगळवारी भारतीय महिलांनी श्रीलंकेचा ८८-४२ असा सहज पराभव केला. स्पर्धेत उद्या विश्रांतीचा दिवस असून, गुरुवारी (ता. २७) भारताची लढत दुबळ्या फिजीशी होणार आहे.

श्रीलंकेवर सहजगत्या विजय

बंगळूर - यजमान भारताने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना गटात अव्वल स्थान पटकावले. कांतिरवा बंदिस्त क्रीडासंकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत मंगळवारी भारतीय महिलांनी श्रीलंकेचा ८८-४२ असा सहज पराभव केला. स्पर्धेत उद्या विश्रांतीचा दिवस असून, गुरुवारी (ता. २७) भारताची लढत दुबळ्या फिजीशी होणार आहे.

सुरवातीच्या दोन प्रयत्नात कर्णधार अनिताला अपयश आल्यानंतर उंच राजप्रियदर्शिनीने भारताचे खाते उघडले आणि त्यानंतर लागलीच जीना हिने लागोपाठ दोन बास्केट करून संघाला ६-० अशी आघाडी मिळवून दिली. दरम्यान श्रीलंकेच्या खेळाडूंचे  बास्केट करण्याचे प्रयत्न अपयशी ठरत होते. अनिताऐवजी मैदानात आलेल्या ग्रीमा वर्गीसने सुरवात छानच केली.

प्रतिस्पर्ध्यांच्या संरक्षित क्षेत्रात घुसून ‘रिबॉउंड’ घेण्यात यशस्वी ठरलेल्या ग्रीमाला बास्केट करण्यापासून रोखण्यात श्रीलंकन खेळाडूंचे फाऊल्स होत होते आणि त्या बदल्यात मिळालेल्या आठही फ्री थ्रोवर गुण नोंदविण्यात ती यशस्वी ठरली. भारताच्या प्रत्येक खेळाडूला बास्केट करण्यात यश येत असल्याचे पाहून श्रीलंकेवरील दडपण वाढले. याचा फायदा घेत भारताने मध्यंतरालाच ४०-१३ अशी मोठी आघाडी घेत जणू सामन्याचा निकालच स्पष्ट केला होता.

उत्तरार्धात प्रेक्षकांची लाडकी ६ फूट ११ इंच उंचीची पूनम चतुर्वेदी मैदानात उतरल्याने तिच्या पुढे खुज्या ठरलेल्या प्रतिस्पर्ध्यांनी हातच गाळले आणि यजमानाच्या सर्वच खेळाडूंनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. शेवटच्या सत्रात श्रीलंकन खेळाडूंनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; परंतु सरस यजमानापुढे त्यांनी नांगी टाकली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्टेडियम डोक्‍यावर घेतले. 

अन्य निकाल - ऑस्ट्रेलिया वि. वि. जपान ८३-७४, न्यूझीलंड वि.वि. तैवान ५९-५३,  दक्षिण कोरिया वि.वि. फिलिपाईन्स ९१-६३, चीन वि.वि. उत्तर कोरिया ११०-५३

Web Title: sports news The second place in the India group with second win