स्पेनची फ्रान्सला पेनल्टी 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

फ्रान्सने खाते उघडल्यानंतर स्पेनने दहा मिनिटांत बरोबरी साधली होती. युरोपातील या दोन प्रमुख संघांमध्ये सुरवातीला फार आकर्षक खेळ दिसला नाही. फ्रान्सने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. डाव्या बाजूने ऍमीन गौईरी याने ही चाल रचली.

गुवाहाटी : युरोपीय विजेत्या स्पेनने फ्रान्सला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अखेरच्या 90व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीच्या जोरावर स्पेनने बाजी मारली. कर्णधार अबेल रुईझ याने ही पेनल्टी सत्कारणी लावली. स्पेनची रविवारी इराणशी लढत होईल. 

फ्रान्सने खाते उघडल्यानंतर स्पेनने दहा मिनिटांत बरोबरी साधली होती. युरोपातील या दोन प्रमुख संघांमध्ये सुरवातीला फार आकर्षक खेळ दिसला नाही. फ्रान्सने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. डाव्या बाजूने ऍमीन गौईरी याने ही चाल रचली. त्यावर लेनी पिंटरने गोल केला. मध्यंतरास एक मिनीट बाकी असताना स्पेनने बरोबरी साधली. बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुआन मिरांडा याने घोडदौड केली. फेरॅन टॉरेस याचा तिरकस पास मिळताच त्याने गोल नोंदविला. 

या गोलनंतर स्पेनचा संघ उत्तरार्धात प्रेरित होऊन खेळला. सर्जीओ गोमेझचा विशेष पुढाकार होता, पण त्याची संधी 56व्या मिनिटाला थोडक्‍यात हुकली. मग सामना पेनल्टी शूट-आउटमध्ये जाण्याची चिन्हे दिसत होती. त्याच वेळी फ्रान्सच्या औमर सोलेटने स्पेनचा बदली खेळाडू होजे लारा याला पाडले. त्यामुळे स्पेनला पेनल्टी बहाल करण्यात आली.

Web Title: Sports news spain beat france in FIFA U17 World cup