नागीण डान्सनंतर बांगलादेशचा धुडगूस

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

कोलंबो - श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील निदहास तिरंगी ट्‌वेंटी-२० स्पर्धेच्या अखेरच्या लढतीतील संघर्ष सामना संपल्यानंतरही कायम राहिला. विजयाने बेभान झालेल्या बांगलादेश खेळाडूंनी  मैदानावर नागीण डान्स करीत यजमान संघाला डिवचले. त्यानंतर प्रेमदासा स्टेडियमवरील ड्रेसिंग रूमच्या काचेचा दरवाजाच फोडला. श्रीलंका सरकारने याबाबतची चौकशी सुरू केली असून, हे प्रकरण चिघळण्याची शक्‍यता आहे. 

कोलंबो - श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील निदहास तिरंगी ट्‌वेंटी-२० स्पर्धेच्या अखेरच्या लढतीतील संघर्ष सामना संपल्यानंतरही कायम राहिला. विजयाने बेभान झालेल्या बांगलादेश खेळाडूंनी  मैदानावर नागीण डान्स करीत यजमान संघाला डिवचले. त्यानंतर प्रेमदासा स्टेडियमवरील ड्रेसिंग रूमच्या काचेचा दरवाजाच फोडला. श्रीलंका सरकारने याबाबतची चौकशी सुरू केली असून, हे प्रकरण चिघळण्याची शक्‍यता आहे. 

बांगलादेश खेळाडू श्रीलंकेविरुद्धचा विजय साजरा करण्यासाठी मैदानात आले, त्या वेळी ड्रेसिंग रूमच्या काचेचे तुकडे पायऱ्यांवर पडल्याचे दिसले. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी याबाबतचे फुटेज पाहिले आहे. कॅटरिंग स्टाफने बांगलादेश खेळाडूंनीच दरवाजा तोडल्याचे सांगितले आहे. आता हे प्रकरण संपवण्यासाठी बांगलादेश संघव्यवस्थापनाने दुरुस्तीचा सर्व खर्च देण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रॉड यांनी बांगलादेश कर्णधार शकीब अल हसन आणि राखीव खेळाडू नुरुल हसन यांना २५ टक्के मानधनाचा दंड केला आहे. त्यांना एका गुणाचा दंडही करण्यात आला आहे. 

सामन्यातील अखेरच्या षटकात पंचांचा निर्णय न पटल्यामुळे बांगलादेश कर्णधार शकीबने महमुदल्ला आणि रुबेल होसेन यांना मैदान सोडण्याची खूण केली होती, त्याबद्दल त्याला शिक्षा झाली. बांगलादेशचा राखीव खेळाडू नुरुल हा कर्णधाराच्या सूचना सांगण्यासाठी मैदानात आला होता; पण त्याने पंचांच्या निर्णयाबद्दल श्रीलंका कर्णधार थिसरा परेराबरोबर भांडण सुरू केले. दोघांनीही चूक मान्य केल्यामुळे याप्रकरणी सुनावणी झालीच नसल्याचे सांगण्यात आले. मैदानावरील प्रकरण संपले असले, तरी ड्रेसिंग रूमचा दरवाजा तोडल्याचे प्रकरण संपलेले नाही. श्रीलंका सरकार या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे वृत्त आकाशवाणीने दिले आहे. 

पुंगी विरुद्ध नागीण डान्स
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील संघर्ष जुनाच आहे. या वर्षाच्या सुरवातीस श्रीलंका संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. त्या वेळी उपुल थरंगा बाद झाल्याचा आनंद व्यक्त करताना नझमुलने नागीन नृत्य केले होते. शुक्रवारच्या सामन्यात रहीम बाद झाल्यानंतर श्रीलंका गोलंदाज अमिला अपोन्सो याने त्याला बाहेर जाण्याची खूण केली; तसेच पुंगी वाजवल्याचा अभिनय केला. बांगलादेश खेळाडू हे विसरले नाहीत. त्यांनी श्रीलंकेस हरवल्यानंतर मैदानात नागीण डान्स केला.

यामुळेही वाद विकोपाला
बांगलादेश बदली खेळाडू नुरुल हसन हा कुसल मेंडिस आणि थिसरा परेरा यांच्या अंगावर धावत गेला होता.
मेंडिस सामना संपल्यानंतर नुरुलच्या दिशेने धावला होता.
शकीब अल हसनचा झेल घेतल्यानंतर अकिल दनाजया याने सापाने डंख मारल्याची खूण केली.
चेंडू खांद्याच्या वरून गेल्याबद्दल देण्यात आलेला नो बॉल रद्द केल्यामुळे बांगलादेश संघ चिडला.
मैदानात धावून आलेला बांगला कर्णधार शकीबने टीव्ही समालोचक रसेल अरनॉल्ड यांच्याबरोबर वाद घातला.

शकीबने कर्णधार म्हणून घेतलेली भूमिका पटली नाही. पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून तो फलंदाजांना मैदानावरून परत बोलावत होता. बांगलादेशचा एक सर्वोत्तम विजय त्याने जवळपास नाकारलाच होता.
- संजय मांजरेकर

मी मैदानात येऊन आमच्या फलंदाजांना सामना सोडण्यास नव्हे, तर खेळ सुरू ठेवण्यास सांगत होतो. या सामन्यात अनेक गोष्टी घडायला नको होत्या, त्या घडल्या. मी संयम राखायला हवा होता. 
- शकीब अल हसन, बांगलादेश कर्णधार

Web Title: sports news sri lanka vs bangladesh T-20 cricket