सुधा सिंगच्या नावामुळे नवा वाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

नवी दिल्ली - आधी चित्रा आणि आता सुधा सिंगच्या जागतिक स्पर्धेतील सहभागावरून भारतीय संघ निवडीवरून सुरू झालेला वाद अधिकच तीव्र होऊ लागला आहे. तीन हजार स्टिपलचेस स्पर्धा प्रकारात भारतीय संघात स्थान नसूनही जागतिक मैदानी स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय महासंघाच्या अधिकृत यादीत सुधा सिंगचे नाव झळकले आणि नव्या वादाला सुरवात झाली. 

नवी दिल्ली - आधी चित्रा आणि आता सुधा सिंगच्या जागतिक स्पर्धेतील सहभागावरून भारतीय संघ निवडीवरून सुरू झालेला वाद अधिकच तीव्र होऊ लागला आहे. तीन हजार स्टिपलचेस स्पर्धा प्रकारात भारतीय संघात स्थान नसूनही जागतिक मैदानी स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय महासंघाच्या अधिकृत यादीत सुधा सिंगचे नाव झळकले आणि नव्या वादाला सुरवात झाली. 

जागतिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात चित्राप्रमाणेच सुधा सिंगचाही समावेश नव्हता. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतरही सुधाला वगळण्यात आल्याने चर्चा सुरू होतीच. त्यात आज आंतरराष्ट्रीय महासंघाने तीन हजार मीटर स्टिपलचेसच्या स्पर्धकांची यादी जाहीर केली, तेव्हा अचानक सुधाचे नाव जोडले गेल्याचे निदर्शनास आले. सुधा हे आव्हान पेलण्यास सज्ज आहे; पण भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाने तिच्यासमोर फुलीच मारली आहे. सुधा म्हणाली, ‘‘आंतरराष्ट्रीय महासंघाच्या यादीत माझे नाव असल्याचे मला आताच समजले; पण या संदर्भात भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाकडून मला अद्याप काही कळविण्यात आलेले नाही. माझी तयारी चांगली आहे. मी जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यास तयार आहे.’’

‘‘विशेष म्हणजे सुधाचा लंडनसाठीचा व्हिसादेखील तयार आहे. भारतीय महासंघाने मला फक्त सांगावे, तुझा संघात समावेश केला आहे. मी लगेच लंडनसाठी रवाना होऊ शकते,’’ असेही सुधाने सांगितले. ती म्हणाली, ‘‘मूळ यादीत माझे नाव नव्हते; पण माझी कामगिरी लक्षात घेऊन नंतर त्यांनी माझे नाव समाविष्ट केले असावे असे मला वाटते. त्यामुळे महासंघाने मला फक्त होय, तुझा समावेश आहे, असे सांगावे. मी लगेच लंडनला जाण्यास निघेन. चित्राप्रमाणे कुठलीही कायदेशीर कारवाई करण्याचा माझा विचार मुळीच नाही.’’

घोळ कुणी केला
सुधाच्या समावेशावरून घोळ तर निश्‍चित झाला आहे; पण तो कुणी केला, याची जबाबदारी कुणीच घेण्यास तयार नाही. भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाचा एक अधिकारी म्हणाला, ‘‘ही मानवी चूक आहे. ऑनलाइन प्रवेशिका पाठवताना ते काम करणारे अधिकारी तिचे नाव खोडण्यास (डिलिट) विसरले असावेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महासंघाच्या यादीत सुधाचे नाव आले असावे.’’ दरम्यान, आंतरराष्ट्रीय महासंघाने चित्राच्या समावेशाची भारताची विनंती फेटाळली.

Web Title: sports news sudha singh