सुईच्या अग्रावरच निभावले

Boxing
Boxing

गोल्ड कोस्ट / मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ‘नो नीडल पॉलिसी’चा भंग केल्याबद्दल भारतावर होणारी कठोर कारवाई टळली आहे. भारतीय बॉक्‍सरला ‘व्हिटॅमिन बी’चे इंजेक्‍शन देणारे डॉ. अमोल पाटील यांना लेखी ताकीद देऊन हे प्रकरण अखेर निकालात काढण्यात आले. त्यामुळे भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रकुल क्रीडानगरीतील सफाई कामगारास भारतीय रूममध्ये सुया आढळल्यामुळे भारताभोवती संशयाची सुई फिरत होती. भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंनी उत्तेजक घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यातच राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने ‘नो नीडल पॉलिसी’ची कठोर अंमलबजावणी करण्याचे ठरवल्यामुळे भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंना प्रवेश नाकारला जाण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. मात्र अखेर डॉ. पाटील यांना दोन पानाची लेखी ताकीद देत हे प्रकरण निकालात काढण्यात आले. डॉ. पाटील यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची प्रत भारतीय पथकासही पाठवण्यात येणार आहे, ज्याद्वारे भारतीयांकडून या प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, असे महासंघाचे मत आहे. 

राष्ट्रकुल क्रीडानगरीतील पॉलिक्‍लिनिकमध्ये जाण्यापूर्वी डॉ. पाटील यांनी सुया रूममध्येच ठेवून दिल्या. नो नीडल पॉलिसीनुसार सुया मध्यवर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवणे बंधनकारक आहे, हा आरोप डॉ. पाटील यांच्यावर ठेवण्यात आला. डॉ. पाटील यांनी इंजेक्‍शन देण्यापूर्वी फॉर्म भरला नाही; पण चौकशीनंतर वैद्यकीय आयुक्तांना ई-मेलद्वारे फॉर्म पाठवला होता. यातील माहिती निकष पूर्ण करणारी होती, असे न्यायालयाचे मत झाले. 

सलग तिसऱ्या स्पर्धेत ताकीद
‘नो नीडल पॉलिसी’चा भंग केल्याबद्दल भारतास ताकीद मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत; तसेच २०१६ च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेतही या प्रकारची ताकीद देण्यात आली होती.

भारतीय बॉक्‍सिंग संघटनेची कारवाई?
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सांगता झाल्यावर डॉ. पाटील; तसेच मार्गदर्शक निएवा यांच्यावर कारवाई करण्याचा विचार भारतीय बॉक्‍सिंग पदाधिकारी करीत आहेत. स्पर्धेपूर्वीच्या सरावाच्या वेळीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कठोर नियमाची कल्पना सर्वांना देण्यात आली होती. खरे तर मार्गदर्शकांनी तब्येत बिघडलेल्या खेळाडूस उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेणे योग्य ठरले असते. 

कोण आहेत डॉ. पाटील
डॉ. पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील जळगावचे; पण त्यांची नियुक्ती भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून झाली असल्याचे सांगितले जाते
पतियाळाच्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेतून स्पोर्टस्‌ मेडिसिनचा कोर्स 
मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण
एका वर्षापासून महिला संघासोबत, रिओ ऑलिंपिकपूर्वीही मार्गदर्शन
भारतीय खेळाडूत कमालीचे लोकप्रिय
डॉ. पाटील यांची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा 
भारतीय कुमार हॉकी संघासोबतही काम करण्याचा अनुभव
बॉक्‍सिंग संघासोबत असलेले डॉ. पाटील यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या अन्य खेळाडूंसाठी एकच डॉक्‍टर आणि एकच फिजिओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com