मुंबई डब्ल्यूटीए, ‘फेडरेशन’मुळे प्रेरणा - अंकिता रैना

मुंबई डब्ल्यूटीए, ‘फेडरेशन’मुळे प्रेरणा - अंकिता रैना

पुणे - गेल्या मोसमात मुंबईतील डब्ल्यूटीए तसेच यंदा दिल्लीतील फेडरेशन स्पर्धेत खेळताना माझा आत्मविश्‍वास उंचावला. सरस क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सरस कामगिरी केल्यामुळे मनोधैर्य उंचावले, अशी प्रतिक्रिया भारताची एकेरीतील अव्वल टेनिसपटू अंकिता रैना हिने व्यक्त केली.

ग्वाल्हेरमध्ये आयटीएफ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अंकिताने शनिवारी फ्रान्सच्या अमांडिन हेसीवर ६-२, ७-५ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत अंकिता २५५वी, तर अमांडिन २१५वी आहे. गेल्या वर्षी मुंबईतील डब्ल्यूटीए स्पर्धेत अंकिताला अमांडिनकडून पराभूत व्हावे लागले होते.

अंकिताने सर्व्हिस भक्कम केली. तिला संपूर्ण सामन्यात सर्व्हिसवर एकाही ब्रेकपॉइंटला सामोरे जावे लागले नाही. अंकिताने आयटीएफ स्पर्धा जिंकून ३९१९ डॉलर आणि ५० डब्ल्यूटीए गुणांची कमाई केली. अंकिताने यापूर्वी पुण्यात डीसेंबर २०१४ मध्ये २५ हजार डॉलर बक्षीस रकमेची स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर सुमारे सव्वातीन वर्षे तिला एकेरीतील विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. दरम्यानच्या काळात तिने दुहेरीत पाच विजेतिपदे मिळविली होती. यात गेल्या वर्षातील चार विजेतेपदांचा समावेश होता.

एकेरीत प्रतीक्षा लांबली असताना दडपण होते का, याविषयी अंकिता म्हणाली की, खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी मी वेगवेगळ्या बाबींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत होते. या गोष्टी जुळून आल्या. यंदाच्या मोसमात काय लक्ष्य आहे, या प्रश्‍नावर अंकिताने जाकार्तमधील आशियाई क्रीडा स्पर्धेचा उल्लेख केला.

जिममध्येच ‘पार्टी’
अंकिता पुण्यात पीवायसी हिंदू जिमखान्यावर हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. अंतिम सामना जिंकल्यानंतर तिने संपर्क साधला, त्या वेळी तिचे अभिनंदन करून बेंद्रे यांनी तिला तडक जिममध्ये जाऊन स्ट्रेचिंग करण्यास सांगितले. अंकिताने स्पर्धा मायदेशात असल्यामुळे फिजिओ ऋतुजा पतंगे यांना बरोबर नेले होते. त्यामुळे तंदुरुस्ती राखण्यासाठी फायदा झाल्याचे तिने नमूद केले.

दृष्टिक्षेपात
 २५ वर्षांच्या अंकिताचे कारकिर्दीतील सहावे आयटीएफ विजेतेपद
 २५ हजार डॉलर बक्षीस रकमेच्या स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेती. यापूर्वी पुण्यात २०१४ मध्ये ही कामगिरी
 २००९ मधील पदार्पणानंतर दहा हजार डॉलर बक्षीस रकमेच्या स्पर्धांत पाच वेळा विजेती

नाओमीचा सिमोनाला धक्का
इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया, ता. १७ ः जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या रुमानियाच्या सिमोना हालेपला पराभवाचा धक्का बसला. जपानच्या नाओमी ओसाकाने तिला ६-३, ६-० असा पराभवाचा धक्का देत बीएनपी पारीबास टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. आता तिची रशियाच्या डॅरीया कॅसाट्‌कीनाशी लढत होईल. डॅरीयाने अमेरिकेच्या व्हिनस विल्म्सला ४-६, ६-४, ७-५ असे हरविले. डॅरीयाने आधीच्या फेऱ्यांत स्टोआनी स्टीफन्स, कॅरोलीन वॉझ्नीयाकी आणि अँजेलिक केर्बर या तीन माजी ग्रॅंड स्लॅम विजेत्यांना हरविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com