आनंद- कास्पारोवची बहुचर्चित लढत बरोबरीत

पीटीआय
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

मुंबई - विश्‍वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव यांच्यातील दोन दशकांपूर्वीच्या जागतिक विजेतेपदाच्या लढतीच्या आठवणींना उजाळा देणारी स्प्रिंगफिल्ड कप स्पर्धेतील लढत बरोबरीत सुटली. सेंट लुईस चेस क्‍लबमधील या जलद स्पर्धेत एका दिवशी तीन लढती होतात. त्यातील ब्रेकच्या वेळी प्रेक्षकही आपली जागा सोडतात; पण आनंद- कास्पारोव लढतींचा आनंद जवळून घेण्यासाठी चाहत्यांनी ब्रेक घेण्याऐवजी मोक्‍याची जागा पटकावणे पसंत केले. या लढतीपूर्वी २२ वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या तत्कालीन वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या लढतीची चर्चा होती. या लढतीनंतर प्रथमच दोघे अमेरिकेत एकमेकांविरुद्ध खेळणार होते.

आनंद आणि कास्पारोव हेच या स्पर्धेतील बुजुर्ग. कास्पारोव आहे ५४ वर्षांचा, तर आनंद ४७. त्यानंतरचा जास्त वयाचा असलेला लेवॉन ॲरॉनियन आनंदपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे आनंदने आमच्यातील चर्चा म्हणजे पहिल्या महायुद्धात सहभागी असलेल्यांसारख्या बुजुर्गांसारखी आहे, अशी टिप्पणी केली. अजूनही कास्पारोव खेळींचा दूरवर तेवढाच विचार करतात. अरॉनियनविरुद्ध विजयाची संधी कशी दवडली, त्या वेळी काय करायला हवे होते, हे मला चालीनुसार सांगितले, असे आनंदने सांगितले. कास्पारोव यांनी मात्र २० वर्षांपूर्वीची ही स्पर्धा असती, तर तीन लढतींनंतर तीन गुण अशी परिस्थिती असती, असे सांगितले. मी आक्रमकच खेळणार, चाहत्यांना आनंद देणार. त्या वेळी चुका होऊ नयेत हीच आशा आहे, असे सांगितले.

लढतही रंगतदार झाली. पांढरे मोहरे असलेल्या आनंदने सिसिलीयन पद्धतीस पसंती दिली. कास्पारोवने उंट आणि अश्‍व कार्यरत करत काही वेळ वर्चस्वही मिळवले. आनंदच्या आगळ्या चालीची योजनाही अपयशी ठरली; मात्र आनंदने कास्पारोवला वर्चस्वापासून वंचित ठेवले. दोघांनी अखेर ३१ चालीनंतर बरोबरी मान्य केली.

दरम्यान, आनंदने चौथ्या फेरीत इयान नेपोमिनिआची याच्याविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली, तर पाचव्या फेरीत डेव्हिड नॅवारा याला पराजित केले. याच फेरीत कास्पारोवला नेपोमिनिआची याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. सहाव्या फेरीनंतर आनंद तसेच कास्पारोव पाच गुणांसह संयुक्त सातवे आहेत. नेपोमिनिआची ८ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.

Web Title: sports news Viswanathan Anand Garry Kasparov chess