चाळिशीतील जाफरची जिगरबाज शतकी भरारी

नरेंद्र चोरे
गुरुवार, 15 मार्च 2018

नागपूर - क्रिकेटमध्ये वय नव्हे, धावा काढणे महत्त्वाचे असते हे ४० वर्षीय वसीम जाफरने इराणी करंडक सामन्यात नाबाद शतक झळकावून दाखवून दिले. कर्णधार फैज फजल व आर. संजयने शतकी सलामी दिल्यानंतर जाफरच्या शतकामुळे विदर्भाने पहिल्या दिवशी शेष भारताविरुद्ध २ बाद २८९ अशी मजबूत धावसंख्या उभारली.

नागपूर - क्रिकेटमध्ये वय नव्हे, धावा काढणे महत्त्वाचे असते हे ४० वर्षीय वसीम जाफरने इराणी करंडक सामन्यात नाबाद शतक झळकावून दाखवून दिले. कर्णधार फैज फजल व आर. संजयने शतकी सलामी दिल्यानंतर जाफरच्या शतकामुळे विदर्भाने पहिल्या दिवशी शेष भारताविरुद्ध २ बाद २८९ अशी मजबूत धावसंख्या उभारली.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाच्या आघाडी फळीने ‘होमग्राउंड’ व अनुकूल खेळपट्‌टीचा पुरेपूर फायदा घेतला. वयाच्या चाळीशीत नाबाद शतकी खेळी करणारा वसीम जाफर पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरला. फजल आणि संजयच्या शानदार सलामीनंतर जाफरने विदर्भाला दिवसअखेरीस मजबूत स्थितीत पोचविले. खेळपट्टीची जरी साथ असली तरी जाफरने आपल्या भात्यातील प्रत्येक फटक्‍याचा वापर केला. कारकिर्दीमधील ५३ वे प्रथमश्रेणी आणि इराणी करंडकातील तिसरे शतक पूर्ण करणाऱ्या जाफरने १६ चौकार व एका षट्‌कारासह १६६ चेंडूंत नाबाद ११३ धावा काढल्या. कर्णधार फैज फजल व आर. संजयनेही अर्धशतक झळकावले. फैजने कर्णधाराला साजेशी खेळी करीत सहा चौकार व एका षट्‌कारासह १९० चेंडूंत ८९ धावा काढल्या. 

विदर्भाला फजल-संजय जोडीने अपेक्षेप्रमाणे मजबूत सुरवात करून दिली. विदर्भाच्या सलामीवीरांनी सकाळच्या सत्रात अतिशय सावधपूर्वक फलंदाजी करीत शेष भारताच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. आर. अश्‍विनसह प्रमुख गोलंदाज गडी बाद करण्यात अपयशी ठरल्यानंतर कर्णधार करुण नायरने फिरकीचा वापर करताना जयंत यादवच्या हाती चेंडू दिला. जयंतने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर संजयला बाद केले. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १०१ धावा जोडल्या. दुसऱ्या सत्रात फजल बाद झाला. शेवटच्या सत्रात विदर्भाने एकही गडी न गमावता ७१ धावा जोडून दिवसाच्या खेळावर निर्विवाद  वर्चस्व गाजविले.

संक्षिप्त धावफलक
विदर्भ पहिला डाव :२ बाद २८९ (फैज फजल ८९, आर. संजय ५३, वसीम जाफर खेळत आहे ११३, गणेश सतीश खेळत आहे २९)

Web Title: sports news wasim jafar irani trophy cricket