मुल्लरविरुद्ध नदालचा संघर्ष अपयशी

पीटीआय
बुधवार, 12 जुलै 2017

लंडन - लक्‍झेम्बर्गचा प्रतिस्पर्धी जिल्स मुल्लरविरुद्ध ‘हॉट फेव्हरीट’ रॅफेल नदालला चौथ्या फेरीत पाच सेटमध्ये पराभूत व्हावे लागले. यंदाच्या विंबल्डनमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमहर्षक लढतीत नदालने निर्णायक पाचवा सेट १५-१३ असा गमावला.

लंडन - लक्‍झेम्बर्गचा प्रतिस्पर्धी जिल्स मुल्लरविरुद्ध ‘हॉट फेव्हरीट’ रॅफेल नदालला चौथ्या फेरीत पाच सेटमध्ये पराभूत व्हावे लागले. यंदाच्या विंबल्डनमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमहर्षक लढतीत नदालने निर्णायक पाचवा सेट १५-१३ असा गमावला.

पहिले दोन सेट गमावल्यानंतर नदालने पिछाडी भरून काढली होती. त्याने चार मॅचपॉइंटही वाचविले, पण सर्व्हिस राखण्याचे दडपण अखेरीस असह्य झाले. ३४ वर्षांच्या मुल्लरची कामगिरी सनसनाटी ठरली. २००८च्या अमेरिकन ओपननंतर त्याने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. नदाल तीव्र चुरशीने खेळ करतो. रॅलिगणिक त्याची जिगर दुपटीने वाढते, पण मुल्लरने त्याचा प्रतिकार दरवेळी परतावून लावला. 

अखेरच्या सेटमध्ये दोघांनी मिळून ३२ वेळा सर्व्हिस राखली. यात नदालने नऊ वेळा सर्व्हिस राखत बरोबरी साधली होती. दोन मॅचपॉइंट वाचवीत त्याने ५-५ अशी बरोबरी साधली. ९-९ अशा स्थितीस त्याने चार ब्रेकपॉइंट दवडले होते. मुल्लरने १०-९ अशा स्थितीस आणखी दोन मॅचपॉइंट घालविले. पहिल्या तीन फेऱ्यांत नदालने एकही सेट गमावला नव्हता. मुल्लरने त्याला अपेक्षेपेक्षा जास्त कडवा प्रतिकार केला.

मुल्लरचा दुसऱ्यांदा धक्का
नदालला विंबल्डनमध्ये दुसऱ्यांदा मुल्लरविरुद्ध मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. यापूर्वी २००५ मध्ये दुसऱ्या फेरीत नदाल ४-६, ६-४, ३-६, ४-६ असे हरला होता. तेव्हा मुल्लर ६९व्या क्रमांकावर होता.

निकाल
रॅफेल नदाल (स्पेन ४) पराभूत विरुद्ध
जिल्स मुल्लर (लक्‍झेम्बर्ग १६) ६-३, ६-४, ३-६, ४-६, १५-१३

मॅरेथॉन मुकाबला
सामन्याचा कालावधी चार तास २८ मिनिटे.
२००८ च्या अंतिम सामन्यात नदालची इतक्‍याच वेळात रॉजर फेडररवर मात.
निर्णायक सेट ९५ मिनिटे चालला.
मुल्लरपेक्षा नदालने सात गुण जास्त जिंकले (१९८-१९१).
नदालला १६ पैकी दोनच ब्रेकपॉइंट जिंकता आले.
मुल्लरने निर्णायक सेटमध्ये १३व्या गेममध्ये एक, तर १९ व्या गेममध्ये चार ब्रेकपॉइंट वाचविले.
एस ः मुल्लर ३०, नदाल २३
विनर्स ः मुल्लर ९५, नदाल ७७.
नदालने निर्णायक सेटच्या दहाव्या आणि विसाव्या गेममध्ये प्रत्येकी दोन मॅचपॉइंट वाचविले.
फ्रेंच ओपनमध्ये नदालने गमावलेले गेम ः ३५.
मुल्लरविरुद्ध गमावलेले गेम ३४.
ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत नदालची डावखुऱ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच कामगिरी ः २६ विजय, तीन पराभव. मुल्लरविरुद्ध दुसरा पराभव.

हा सामना खडतर होता. अखेरच्या दोन मॅचपॉइंटच्या वेळी मी शंभर टक्के प्रयत्न करायचे इतकेच ठरविले होते. तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये माझा खेळ चांगला होत नव्हता, पण मी प्रयत्न सुरू ठेवले. जिंकलो नाही तर नदाल फार सरस आहे असे तेव्हा मी मनाशी म्हणालो होतो. नंतर मी सर्व्हिसमध्ये सुधारणा केली. अखेरीस दोन-चार गुण निर्णायक ठरणार होते.
- जिल्स मुल्लर

मुल्लरविषयी 
एटीपी टूरवरील १६वे वर्ष
गेले दीड दशक जेतेपदाचे खाते रिकामे
यंदाच्या मोसमाच्या प्रारंभी सिडनीत विजेतेपद
अंतिम सामन्यात ब्रिटनच्या डॅन इव्हान्सवर मात

Web Title: sports news wimbledon 2017 nadal