मानांकित वॉव्रींकाला धक्का

पीटीआय
बुधवार, 5 जुलै 2017

लंडन - रशियाच्या डॅनील मेडवेडेवने विंबल्डन पदार्पणात स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकावर सनसनाटी विजय मिळविला. सव्वादोन तासांत चार सेटमध्ये विजय मिळविल्यानंतर त्याने ऑल इंग्लंड क्‍लबच्या सेंटर कोर्टवरील हिरवळीचे ‘किस’ घेतले तेव्हा तमाम प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत होते.

लंडन - रशियाच्या डॅनील मेडवेडेवने विंबल्डन पदार्पणात स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकावर सनसनाटी विजय मिळविला. सव्वादोन तासांत चार सेटमध्ये विजय मिळविल्यानंतर त्याने ऑल इंग्लंड क्‍लबच्या सेंटर कोर्टवरील हिरवळीचे ‘किस’ घेतले तेव्हा तमाम प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत होते.

तीन वेळचा ग्रॅंड स्लॅमविजेता वॉव्रींका २१ वर्षांच्या मेडवेडेवकडून हरणे धक्कादायक ठरले. त्याला पाचवे मानांकन होते. त्याला गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त केले होते. नव्या पिढीतील ताकदवान प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्याने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली होती. मेडवेडेवने दोन्ही बाजूंनी जोरदार फटके सफाईने मारले. त्याचे हे बलस्थान आणि वॉव्रींकाची दुखापत यात निकालात निर्णायक बाब कुठली ठरली हे सांगणे कठीण होते. ४९व्या स्थानावरील मेडवेडेवची ही कारकिर्दीतील तिसरीच ग्रॅंड स्लॅम स्पर्धा आहे. वॉव्रींकाने गेल्याच महिन्यात फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती, पण विंबल्डनमध्ये सहाव्यांदा पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. तो एकदाही उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारू शकलेला नाही. तो म्हणाला, ‘मला शंभर टक्के तंदुरुस्त वाटत नव्हते, पण एका भक्कम प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मी खेळलो. मेडवेडेवचा आत्मविश्‍वास उंचावला होता. तो जास्त वेगवान खेळ करीत होता. हा पराभव निराशाजनक आहे.’

मेडवेडेवने दहावा ‘एस’ मारून मॅचपॉइंट मिळविला. त्यानंतर वॉव्रींकाचा फोरहॅंड बाहेर गेला.

अग्रमानांकित अँजेलिकची विजयी सलामी
महिला एकेरीत अग्रमानांकित जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने विजयी सलामी दिली. तिने पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या आयरिना फाल्कोनी हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला. 

जोकोविच, फेडररला पुढे चाल 
नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर या दोघांना फारसे प्रयास पडले नाहीत. दोघांनी एक सेट जिंकल्यानंतर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतली. जोकोविच ६-३, २-० असा पुढे असताना मार्टिन क्‍लिझॅनने त्याला पुढे चाल दिली. युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोल्गोपोलोव याच्याविरुद्ध फेडरर ६-३, ३-० असा पुढे होता.

इतर प्रमुख निकाल 
पुरुष एकेरी ः डेव्हिड फेरर (स्पेन) विवि रिचर्ड गास्के (फ्रान्स २२) ६-३, ६-४, ५-७, ६-२. मिलॉस राओनिच (कॅनडा ६) विवि यान-लेन्नार्ड स्ट्रफ (जर्मनी) ७-६ (७-५), ६-२, ७-६ (७-४). जुआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेंटिना २९) विवि थानासी कोक्कीनाकीस (ऑस्ट्रेलिया) ६-३, ३-६, ७-६ (७-२), ६-४. महिला एकेरी ः गार्बीन मुगुरुझा (स्पेन १४) विवि एकातेरीना अलेक्‍झांड्रोवा (रशिया) ६-२, ६-४.

विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर मातब्बर प्रतिस्पर्ध्याला हरविल्यानंतर भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. ही कामगिरी सदैव स्मरणात राहील.
- डॅनिल मेडवेडेव

Web Title: sports news Wimbledon 2017 tennis