महाराष्ट्राच्या महिलांनी विजेतेपद राखले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

इचलकंरजी - वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महिलांच्या विभागात महाराष्ट्राने विजेतेपद आपल्याकडे राखण्याची परंपरा कायम राखली; तर पुरुष विभागात महाराष्ट्राच्या पुरुष संघाला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी रेल्वेकडून एका गुणाने निसटता पराभव पत्करावा लागला.

इचलकंरजी - वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महिलांच्या विभागात महाराष्ट्राने विजेतेपद आपल्याकडे राखण्याची परंपरा कायम राखली; तर पुरुष विभागात महाराष्ट्राच्या पुरुष संघाला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी रेल्वेकडून एका गुणाने निसटता पराभव पत्करावा लागला.

या स्पर्धेत रेल्वेचा अमित पाटील ‘एकलव्य’, तर महाराष्ट्राची प्रियंका भोपी ‘राणी लक्ष्मीबाई’ पुरस्काराची मानकरी ठरली. महाराष्ट्राच्या महिलांनी सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या महिलांना २१व्यांदा राष्ट्रीय विजेतेपद मिळविले. रेल्वेचे हे आठवे, तर सलग दुसरे विजेतेपद ठरले. 

पुरुष गटातील सामना केवळ नावापुरता दोन संघांत खेळवला जातो. प्रतिस्पर्धी दोन संघ असले, तरी मैदानावर महाराष्ट्राचेच खेळाडू खेळत असतात. त्यामुळे विजेतेपदाची वेगळीच चुरस प्रत्येक वेळेस दिसून येते. या वेळेसही अंतिम सामना चुरशीने झाला. महाराष्ट्राच्या खेळाडूंचे प्रयत्न अगदी थोडक्‍यात कमी पडले. त्यांना १७-१६ असा एका गुणाने पराभव पत्करावा लागला. उत्तरार्धात महाराष्ट्राच्या मुलांनी चांगली कामगिरी केली. मात्र, विश्रांतीला (८-९) राहिलेली एका गुणाची पिछाडी त्यांना महागात पडली. रेल्वेकडून दीपेश मोरे (२ मिनिट, २.५० मिनीट आणि २ गडी), मिलिंद चावरेकर (दोन्ही डावांत प्रत्येकी १ मिनीट आणि ४ गडी) यांची अष्टपैलू; तर अमित पाटीलची (३ गडी) आक्रमक कामगिरी निर्णायक ठरली. महाराष्ट्राकडून हर्षद हातणकर, महेश शिंदे यांचा बचाव भक्कम राहिला. ऋषिकेश मुर्चावडे, प्रतीक वाईकर, सुरेश सावंत यांच्या आक्रमणाची त्यांना सुरेख साथ मिळाली.

महाराष्ट्राच्या महिलांनी विजेतेपद राखताना भारतीय एअरपोर्ट ॲथॉरिटी संघाचा प्रतिकार एकाच गुणाने परतवून लावला. अधिक बचावात्मक झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या महिलांनादेखील विश्रांतीची (३-२) आघाडी निर्णायक ठरली. महाराष्ट्राची प्रियंका भोपीच विजयाची खरी शिल्पकार ठरली. तिने पहिल्या डावात ३, तर दुसऱ्या डावात ४.१० मिनिटे बचाव करून प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमकांसमोर तगडे आव्हान उभे केले होते. ऐश्‍वर्या सावंत (४.४० मिनिटे, २.४० मिनिटे आणि २ गडी) आणि कविता घाणेकर, काजल भोर, अपेक्षा सुतार यांची तिला सुरेख साथ मिळाली. एअरपोर्टकडून पौर्णिमा सकपाळ, एम. वीणा, सारिका काळे यांचा खेळ उल्लेखनीय झाला.

Web Title: sports news women kho-kho