अपेक्षित सलामी सिंधूकडून खडतर

अपेक्षित सलामी सिंधूकडून खडतर

मुंबई - पहिला गेम सहज जिंकल्यावर सिंधू काहीशी गाफील राहिली. त्यामुळे तिला वर्ल्ड सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातील गटसाखळीतील विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. किदांबी श्रीकांत याला मात्र जगज्जेत्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेनविरुद्ध हार पत्करावी लागली. 

सिंधूने चीनच्या हे बिंगजिओ हिला २१-११, १५-२१, २१-१८ असे हरवले खरे; पण चौदा मिनिटांत पहिला गेम जिंकल्यावर दुसऱ्या गेमच्या सुरवातीस सिंधूने प्रतिस्पर्धीस प्रतिआक्रमणाची काहीशी संधीच दिली. प्राथमिक गटसाखळीत गुण समान झाल्यास गेमफरक (जिंकलेले आणि हरलेले) निर्णायक ठरणार आहे, या स्थितीत सिंधूसाठी हे धोक्‍याचे ठरू शकेल. व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेनने श्रीकांतचा प्रतिकार २१-१३, २१-१७ असा काहीसा सहज परतवला.

खरतर पहिल्या गेममध्ये सिंधूचा खेळ ऑलिंपिक, तसेच जागतिक उपविजेतीस साजेसा होता. तिच्या आक्रमणाने चिनी प्रतिस्पर्धी जेरीस आली होती; मात्र दुसऱ्या गेमच्या सुरवातीस ५-४ असलेली चुरस होती; पण काही वेळातच सिंधू ६-१२ मागे पडली. या आघाडीमुळे बिंगजिओचा आत्मविश्‍वास उंचावला. तिने सिंधूला कोर्टवर नाचवण्यास सुरवात केली होती. निर्णायक गेममध्ये सुरवातीच्या पिछाडीनंतर सिंधू आक्रमक झाली. ५-५ बरोबरीनंतर तिने ११-७ आघाडी घेत पकड घेतली. या वेळी सिंधूचे क्रॉस कोर्ट स्मॅश तसेच ड्रॉप्स बहारदार होते. यानंतर तिने कधीही आघाडी गमावली नाही; पण त्याचवेळी सिंधूला आपला एकही रेफरल योग्य ठरला नाही, हे सलत असेल.

दुखापतीमुळे ब्रेक घेणे भाग पडलेल्या श्रीकांतचा खेळ क्वचितच उंचावला. श्रीकांतने पहिल्या गेममध्ये ०-४ पिछाडीनंतर काही वेळ आघाडीही घेतली; पण त्यानंतर ॲक्‍सेलसेनच्या स्मॅश, तसेच शटलच्या योग्य पेरणीने त्याला त्रस्त केले. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने उत्तरार्धातही लढत दिली, पण तो प्रतिस्पर्धीस गाठू शकणार नाही, हे स्पष्टपणे जाणवत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com