पिंजऱ्यातील कुस्तीत किरण भगत विजेता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

'एकलंगी पलटी'वर मनजितसिंगला केले चीतपट

'एकलंगी पलटी'वर मनजितसिंगला केले चीतपट
सांगली - स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी देशात प्रथमच सांगलीत झालेल्या लोखंडी पिंजऱ्यातील कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन बेल्जियमच्या मनजितसिंगला सहाव्या मिनिटात "एकलंगी पलटी' डावावर अस्मान दाखवले. "तुझ्यात जीव रंगला फेम' राणा ऊर्फ हार्दिक जोशी आणि हजारो कुस्ती शौकिनांची उपस्थिती मैदानाचे आकर्षण ठरले.

डॉ. आंबेडकर स्टेडियमवर रात्री साडेआठ वाजता 140 किलो वजनाचा बेल्जिअमकडून खेळणारा मनजितसिंग मैदानावर उतरला. पाठोपाठ 105 किलो वजनाचा किरण भगत मैदानात उतरला. राणा ऊर्फ हार्दिक जोशी, शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे, अभिनेता मल्ल सुनील भालदार, कुस्तीप्रेमी संस्थेचे संस्थापक मारुती जाधव यांच्या हस्ते कुस्ती लावली गेली. त्यानंतर पिंजऱ्याला कुलूप लावले गेले.

कुस्ती सुरू झाल्यानंतर दोन्ही मल्लांमध्ये दोन मिनिटे खडाखडी झाली. दोघांनी एकमेकांच्या ताकदीच्या अंदाज घेतला. खडाखडी झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या मिनिटाला किरणने मनजितसिंगवर कब्जा घेतला. पोकळ घिस्सा डाव टाकण्याचा प्रयत्न केला. मनजितने कब्जातून सुटण्याचा प्रयत्न केला; परंतु मानेवर घुटना ठेवून किरणने त्याला पकडून ठेवले. कुस्ती पिंजऱ्याकडेला गेल्यानंतर सोडवून पुन्हा मध्यभागी घेतली. मनजितला पहिल्या स्थितीत खाली बसवले. किरणने त्याच्यावर कब्जा घेतला. मनजित पकडीतून सुटत असतानाच किरणने सहाव्या मिनिटाला एकलंगी पलटी डाव टाकत मनजितला अस्मान दाखवले. पिंजऱ्याचे कुलूप काढले गेले. किरणने हात उंचावून हजारो प्रेक्षकांना अभिवादन केले आणि पिंजऱ्यातील अनोखी कुस्ती पाहण्यासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षेत असलेल्या हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले गेले. विजेत्या किरणला चार लाख रुपये आणि उपविजेत्या मनजितसिंगला एक लाख रुपये बक्षीस मिळाले.

Web Title: sports news wrestling competition