श्रीलंकेचा द. आफ्रिकेला व्हाइट वॉश

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

-कर्णधार दिनेश चंडिमल, प्रशिक्षक चंडिका हाथुरासिंघे यांच्यावर बंदी असताना त्यांच्या गैरहजेरीत श्रीलंकेचा विजय 
-उपखंडात दक्षिण आफ्रिकेला 12 वर्षांनी व्हाईट वॉश. यापूर्वी श्रीलंकेकडूनच 2-0 असा पराभव 
-चौथ्या डावात पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद करण्याची हेराथची 12वी वेळ. 
-हेराथच्या कारकिर्दीत चौथ्या डावात 115 विकेट्‌स 

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेचा 200 धावांनी पराभव केला. या दुसऱ्या विजयासह त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकली. 

श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका संघावरील हा 2006 नंतर मिळविलेला मोठा विजय ठरला. ऑफ स्पिन गोलंदाज रंगना हेराथ याने सहा गडी बाद करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विजयासाठी 490 धावांचे आव्हान असताना द. आफ्रिकेचा डाव 290 धावांत संपुष्टात आला. थेऊनिस डी ब्रुईन याने शतकी खेळी करूनही दक्षिण आफ्रिकेला पराभव वाचविण्यात अपयश आले. 

श्रीलंकेने पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशीच विजय मिळविला होता. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 73 धावांतच संपुष्टात आला होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 5 बाद 139 धावा झाल्या होत्या. चौथ्या दिवशी खेळायला सुरवात झाली, तेव्हा सामना खरे तर पहिल्या तासाभरातच संपला होता. मात्र, श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडत जणू दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सामना वाचविण्याची संधी देण्याचा चंग बांधल्यासारखे वाटत होते. यामुळे डी ब्रुईन आणि तेम्बा बौउमा यांनी सहाव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेकडून ही कुठल्याही विकेटसाठी झालेली उपखंडातील सर्वोत्तम भागीदारी ठरली. ब्रुईने शानदार शतकी खेळी केली; पण ब्रुईन-बौऊमा जोडी फुटल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना हेराथचा सामना करता आला नाही. 

संक्षिप्त धावफलक 
श्रीलंका 338 आणि 5 बाद 275 घोषित वि.वि दक्षिण आफ्रिका 124 आणि 290 (डी ब्रुईन 101, तेम्बा बौऊमा 63, डीन एल्गर 37, रंगना हेराथ 6-98, दिलरुवान परेरा 2-90, अकिला धनंजय 2-67) 

-कर्णधार दिनेश चंडिमल, प्रशिक्षक चंडिका हाथुरासिंघे यांच्यावर बंदी असताना त्यांच्या गैरहजेरीत श्रीलंकेचा विजय 
-उपखंडात दक्षिण आफ्रिकेला 12 वर्षांनी व्हाईट वॉश. यापूर्वी श्रीलंकेकडूनच 2-0 असा पराभव 
-चौथ्या डावात पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद करण्याची हेराथची 12वी वेळ. 
-हेराथच्या कारकिर्दीत चौथ्या डावात 115 विकेट्‌स 

Web Title: Sri Lanka close in on whitewash of South Africa