
NZ vs SL 1st Test : तिकडं श्रीलंकेनं पहिल्याच दिवशी 305 धावा केल्या अन् इकडं भारताचं टेन्शन वाढलं
NZ vs SL 1st Test WTC Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 धावा केल्या. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखल्याने भारताचे टेन्शन वाढले. मात्र तिकडे न्यूझीलंडमध्ये श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी 6 बाद 305 धावा करत भारताच्या डोक्याचा ताप अजूनच वाढवला. श्रीलंका भारताचे WTC फायनल गाठण्याचे स्वप्न तोडू शकते. त्यामुळे भारतीय संघ कोणत्या परिस्थितीत WTC फायनल गाठू शकतो हे पहावे लागेल.
- भारताने चौथा कसोटी सामना जिंकला तर..
भारताला जर आरामात WTC ची फायनल गाठायची असेल तर रोहित सेनेला चौथी कसोटी जिंकावी लागेल. जर भारत जिंकला तर श्रीलंका फायनलच्या रेसमधून बाहेर पडतो. मग श्रीलंकेने न्यूझीलंडविरूद्धच्या दोन्ही कसोटी जिंकल्या तरी काही फरक पडणार नाही.
- जर भारत कसोटी हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर..
जर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धची चौथी कसोटी हरली किंवा कसोटी ड्रॉ झाली तर ही गोष्ट श्रीलंकेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडविरूद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील तरच त्यांना WTC फायनल गाठता येईल.
- श्रीलंका दोन्ही कसोटी जिंकण्यात अपयशी ठरला तर..
जर श्रीलंका न्यूझीलंडमधील दोन्ही कसोटी जिंकण्यात अपयशी ठरला तर भारत चौथ्या कसोटीत कोणताही निकाल लागू देत भारत फायनलमध्ये पोहचतोय.
भारतीय संघाला चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगली सुरूवात करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 धावा करत चांगली सुरूवात केली. उस्मान ख्वाजाने 104 धावांची नाबाद शतकी खेळी केली आहे. तर कॅमरून ग्रीनने 49 धावांची आक्रमक खेळी करत त्याला चागंली साथ दिली. उद्या भारताला या सेट झालेल्या दोन्ही फलंदाजांना बाद करत उरलेला कांगारूंचा संघ देखील माघारी धाडायचा आहे.
हेही वाचा : डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...