लखनौ : किदांबी श्रीकांतचे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले. त्याला दक्षिण कोरियाच्या सॉन वॅन हो याच्याविरुद्ध दोन गेममध्येच हार पत्करावी लागली. सौरभ वर्मा आणि रितूपर्णा दास यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करीत भारताच्या आशा कायम ठेवल्या.
श्रीकांत तसेच सॉन हे काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल होते. त्यांच्यातील लढतीत मोक्याच्या वेळी गुण जिंकण्यात अपयशी ठरलेला श्रीकांत 18-21, 19-21 असा पराजित झाला. पाऊण तासाच्या लढतीत श्रीकांतच्या खेळात सातत्य नव्हते, त्यामुळे त्याचा विजेतेपदाचा दुष्काळ लांबला. अग्रमानांकित शि युक्वीच्या पराभवामुळे श्रीकांतकडून अपेक्षा उंचावल्या होत्या, पण त्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले.
सौरभने जागतिक कुमार स्पर्धा तीनदा जिंकलेल्या कुनालुत वितिदासर्न याला 21-19, 21-16 पराजित करीत भारताच्या आशा राखल्या. वितिदासर्न याने यापूर्वीच्या फेरीत जागतिक ब्रॉंझ विजेत्या साई प्रणीतला हरवले होते.
महिला एकेरीत भारताच्या आशा आता रितूपर्णा दास हिच्यावरच असतील. रितूपर्णाने श्रुती मुंदडाचे आव्हान 24-26, 21-10, 21-19 असे परतवले. रितूपर्णा जागतिक क्रमवारीत 165 वी आहे. त्यामुळे तिचे यश धक्कादायक आहे.
|