World Cup 2019 : श्रीलंकेने संधी साधली; अफगाणिस्तानवर 34 धावांनी विजय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जून 2019

पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलेल्या नुआन प्रदीपच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मंगळवारी श्रीलंका संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या 41 षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानचा 34 धावांनी पराभव केला. 

वर्ल्ड कप 2019 : कार्डिफ : पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलेल्या नुआन प्रदीपच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मंगळवारी श्रीलंका संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या 41 षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानचा 34 धावांनी पराभव केला. 

झंझावती सुरवात आणि महंमद नबीच्या नाट्यपूर्ण षटकानंतर श्रीलंका संघाला 41 षटकांत 201 धावांचीच मजल मारता आली. अर्थात, अफगाणिस्तानसाठी ही धावसंख्या मोठीच ठरली. त्यांचा डाव 32.4 षटकांत 152 धावांत आटोपला. पहिल्या सामन्यातून वगळलेल्या नुआन प्रदीपने भेदक मारा करत 31 धावांत 4 गडी बाद केले. 

ऑस्ट्रेलियासमोर नेटाने उभे राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या अचूक माऱ्यापुढे टिकता आले नाही. ढगाळ हवामानामुळे वेगवान गोलंदाजीस पोषक झालेल्या वातावरणाचा श्रीलंका गोलंदाजांनी अचूक फायदा उठवला. हजरतुल्ला (30) आणि नजिबुल्ला झद्रन (43) वगळता त्यांचे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाही. आंतरराष्ट्रीय सामन्याचा कमी अनुभवच त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरला. 

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाला कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यानी झकास सुरवात करून दिली होती. आक्रमक खेळणाऱ्या श्रीलंकेला महंमद नबीने पहिला धक्का दिला. त्याने करुणारत्नेला बाद केले. मात्र, या दोघांच्या 92 धावांच्या सलामीने श्रीलंका एकवेळ 1 बाद 144 असे सुरक्षित होते. त्यांच्या डावाला 22व्या षटकांत नाट्यमय कलाटणी मिळाली. नबीने या षटकांत पाच चेंडूंत श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना ंतबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे सहापेक्षा अधिक धावगतीने आगेकूच करणाऱ्या श्रीलंकेचा डाव अडचणीत आला. पावसाने सामन्यात व्यत्यय आणला तेव्हा त्यांची अवस्था 8 बाद 182 अशी होती. 

पावसाच्या विश्रांतीनंतर सामना 41 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी श्रीलंकेने 19 धावांची भर घातली. श्रीलंकेकडून कुशल परेरा याने सर्वाधिक 78 धावा केल्या. त्यानंतर त्यांच्या डावात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी दिलेल्या 35 अवांतर धावाच अधिक होत्या. 

संक्षिप्त धावफलक : 
श्रीलंका 36.5 षटकांत 201 (दिमुथ करुणारत्ने 30, कुशल परेरा 78 -81 चेंडू, 8 चौकार, लाहिरू थिरीमन्ने 25, महंमद नबी 9-0-30-4, रशिद खान 7.5-1-17-2, दवलत झद्रान 6-0-34-2) वि.वि. अफगाणिस्तान 32.4 षटकांत 152 (हजरतुल्ला झझाई 30, नजबिुल्ला झद्रन 31, नुआन प्रदीप 9-1-34-4, लसिथ मलिंगा 6.4-0-39-3)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SriLanka wins against Afghanistan in World Cup 2019