
Maharashtra Athletics Championship : नाशिकच्या सर्वेशला उंच उडीत सुवर्णपदक
नागपूर : शिवछत्रपती क्रीडा नगरी बालेवाडी येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत उंच उडीत राष्ट्रीय विजेत्या नाशिकच्या सर्वेश कुशारेने अपेक्षीत सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या ११० मीटर हर्डल्स शर्यतीत छत्रपती संभाजीनगरच्या राष्ट्रीय विजेत्या तेजस शिरसेने १३.९७ सेकंदात बाजी मारली.
तीन दिवसीय स्पर्धेत दुसऱ्या दिवसाअखेर नाशिक, ठाणे, पुणे, कोल्हापूरच्या खेळाडूंनी वर्चस्व मिळविले आहे. आर्मीत कार्यरत असलेल्या व आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्वेशने २.२० मीटर अंतरावर उडी मारली व सुवर्णपदक निश्चित केले. यात सांगलीच्या ऋषीकेश काटेने रौप्य व पुण्याच्या धैर्यशील गायकवाडने ब्राँझपदक जिंकले.
पुरुषांची पंधराशे मीटर शर्यत कोल्हापूरच्या ओंकार कुंभारने तर महिलांची शर्यत पुण्याच्या शिवेच्छा पाटीलने जिंकली. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत नाशिकचा शुभम भंडारे ८ मिनीटे ४९.४५ सेकंदात अव्वल ठरला. यात कोल्हापूरच्या सिद्धांत पुजारीने रौप्य जिंकले. महिलांत प्रथम दोन्ही स्थान सातारच्या खेळाडूंनी मिळविली. यात सुवर्णपदक सानिका नलावडे व रौप्य वैष्णवी सावंतने जिंकले. महिलांची चारशे मीटर हर्डल्स शर्यत ठाण्याच्या निधी सिंगने जिंकली.
वरिष्ठ गट राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा नाशिकचा सर्वेश कुशारे, सांगलीचा ऋषिकेश काटे (रौप्य) व पुण्याचा धैर्यशील गायकवाड (ब्राँझ) राजन, निधीला ब्राँझपदक पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत नागपूरच्या राजन यादवला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. त्याने ९ मिनीटे ०५.६८ सेकंदात शर्यत पूर्ण केली.
महिलांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत नेहा ढबालेला ब्राँझपदक मिळाले. तिने १ मिनीट ०८.६५ सेकंद वेळ दिली. पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत आशुतोष बावणे अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. प्राथमिक फेरीत दुसरे स्थान मिळविताना त्याने १ मिनीट ५७.९६ सेकंद वेळ दिली. महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत प्रथमच वरिष्ठ गटाची अंतिम फेरी गाठणाऱ्या आर्या कोरेला सहावे स्थान मिळाले. तिने १ मिनीट ०४.२२ सेकंद वेळ दिली.