राज्य जलतरण संघटनेची मान्यता रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे -  महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या दोन गटांमधील वाद आपापसांत सोडवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) अखेर राज्य जलतरण संघटनेची मान्यता रद्द केली. महासंघाचे अध्यक्ष दिगंबर कामत यांनी हा निर्णय घेतला. राज्य संघटना अस्तित्वात नसल्याने राज्यातील जलतरणपटूंचे नुकसान होऊ नये, यासाठी आगामी कुमार राष्ट्रीय स्पर्धांसाठी राज्याचा संघ निवडण्याकरिता राज्य स्पर्धेऐवजी निवड चाचणी घेण्याचा निर्णय महासंघाला घ्यावा लागला आहे. 

सात वर्षे वार्षिक सर्वसाधारण सभा न घेतल्याने भारतीय जलतरण महासंघाने २००८ मध्येच राज्य संघटना बरखास्त करून तात्पुरती समिती नियुक्त केली होती. त्यानंतर ३० एप्रिल २०१५ रोजी या समितीने निवडणूक घेतली आणि अभय दाढे यांच्या अध्यक्षतेखालील संघटना अस्तित्वात आली. तेव्हापासून राज्यात अभय दाढे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य संघटना अस्तित्वात होती. 

या संघटनेला महासंघाने अधिकृत मान्यता दिली होती. मात्र, त्याच वेळी बरखास्त संघटनेने देखील पुन्हा डोके वर काढून परस्पर निवडणूक घेत आपलीच संघटना खरी असल्याचा दावा केला. या संघटनेने सहायक धर्मादाय आयुक्तांकडे ''चेंज रिपोर्ट''ही सादर केला. त्यामुळे राज्यात दोन संघटना अस्तित्वात होत्या. या दोन्ही संघटनेच्या वादात राज्यातील जलतरणपटूंचे नुकसान होत होते. बरखास्त समितीच्या चेंज रिपोर्टला दाढे यांच्या संघटनेने दिलेले आव्हान आणि स्पर्धा घेण्याची परवानगी मागण्यासाठी बरखास्त समितीने केलेला दावा, अशी या संघटनेतील दोन्ही प्रकरणे अजून न्याय प्रविष्ट आहेत.

निवड चाचणी कशामुळे?
दोन संघटनांच्या या वादात राज्यातल्या जलतरणपटूंचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य निवड स्पर्धा न घेता केवळ निवड चाचण्या (टाइम ट्रायल्स) स्वतः घेण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. या चाचण्या जलतरण महासंघाच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने २५ ते २७ मे रोजी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात घेण्यात येतील. केवळ चाचणी असल्यामुळे स्पर्धकांना प्रमाणपत्रे मिळणार नाहीत. चाचणीसाठी जलतरण महासंघ दोन निरीक्षक पाठविणार आहे. अधिक माहितीसाठी जय आपटे (मोबाईल क्रमांक - 9822431015) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जलतरण महासंघाने केले आहे.

राज्य हौशी जलतरण संघटनेची मान्यता रद्द करण्यात आल्यामुळे खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी आम्हाला निवड चाचणी घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. 
- कमलेश नानावटी, भारतीय जलतरण महासंघाचे सरचिटणीस

Web Title: state swimming organisation permission cancel