चेंडू कुरतडण्याच्या कटात सहभागी नव्हतो

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाचे निलंबन असणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू कुरतडल्याची पुन्हा एकदा कबुली दिली. ​

सिडनी : चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाचे निलंबन असणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू कुरतडल्याची पुन्हा एकदा कबुली दिली. मात्र, या कटात आपण सहभागी नव्हतो. पण, जेव्हा असे घडणार हे समजले तेव्हा ते रोखू शकलो नाही, हे माझ्यातील कर्णधाराचे अपयश आहे, असेही त्याने स्पष्ट केले. 

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात स्मिथसह उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर, फलंदाज कॅमेरून बॅंक्रॉफ्ट यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आहे. या सगळ्या प्रकरणाने ऑस्ट्रेलियालच नाही, तर अवघे क्रिकेट विश्‍व ढवळून निघाले होते. 

या प्रकरणी माफी मागितल्यानंतर स्मिथने प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, ""चेंडू कुरतडण्याचे नियोजन सुरू असल्याचे मला न्यूलॅंड्‌स येथील ड्रेसिंगरूममध्ये कानावर आले होते. त्या वेळी मला असे करण्यापासून रोखण्याची संधी होती. मला ते शक्‍यदेखील होते. पण, मी तसे केले नाही. कर्णधार म्हणून येथेच मी अपयशी ठरलो.'' 

या संदर्भात अधिक खुलासा करताना स्मिथ म्हणाला, ""त्यांना रोखण्यापेक्षा मी "मला यात पडायचे नाही. तुमचे काय चालले हे माहित करून घेण्याचीही मला गरज नाही,' असे उत्तर दिले. हे माझे अपयश होते आणि त्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आल्यावर कर्णधार या नात्याने मी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली.'' स्मिथने या वेळी मात्र चर्चा करणाऱ्या त्या खेळाडूंची नावे सांगण्यास नकार दिला. 

या प्रकरणात बॅंक्रॉफ्टवर नऊ महिन्यांचीच बंदी होती. ही बंदी 29 डिसेंबरला उठणार आहे. त्यामुळे तो जानेवारीपासून खेळू शकेल. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर मात्र वर्षाची बंदी असल्यामुळे ते मार्च 2019 पर्यंत खेळूच शकत नाहीत. 

स्मिथ म्हणाला... 
-बंदीनंतरचे दिवस खूप कठीण जात आहेत. 
-काही दिवस इतके भयानक होते की, बेडमधून बाहेर पडावेसेच वाटत नव्हते. 
-माझ्याभोवती असलेल्या माझ्या निकटवर्तीयांनी मला यातून बाहेर पडण्यास मदत केली. 
-माझ्याकडून चूक झाली, खूप मोठी; आता यातून बाहेर पडून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय.

Web Title: steve smith opens up on ball tampering