उद्याचे मल्ल घडवण्यासाठी तरुणाची अशी ही धडपड...

निवास मोटे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

ग्रामिण भागातील अनेक तालमी ओस पडल्या आहेत.गावच्या आखाड्यात घुमणारा पैलवानांच्या शड्डूचा आवाज सध्या कानी पडणे मुश्किल झाले असताना, कोल्हापूर नजिकच्या एका खेडेगावातील तरुण आपल्या कुस्तीतुन निवृत्ती घेत, अनेक मुलांना कुस्तीचे धडे देत आहे. त्यांना उत्कृष्ट मल्ल बनवण्याच्या ध्येयाने तो झपाटला आहे...

कोल्हापूर - मन आणि शरीर बळकट, तंदुरुस्त बनविण्यासाठी उपयुक्त ठरणारी पारंपरिक कुस्ती अलीकडच्या काळात लुप्त होते काय, अशी शंका व्यक्त होत आहे. अशा स्थितीत आळवे (ता. पन्हाळा) गावच्या आदिनाथ सखाराम बंगे या तरुणाने मातीतील कुस्ती व नव्या काळाच्या गरजेनुसार मॅटवरची कुस्ती पुनर्जीवित करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी त्याने गावच्या पंचक्रोशीतील इयत्ता पहिलीपासून ते बारावीचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी मुले, मुलींना तो सात वर्षांपासून कुस्तीचे मोफत प्रशिक्षण देत आहे. 

कुस्तीपट्टू नंतर आदिनाथ आता वस्तादाच्या भुमिकेत

आदिनाथ हा उच्चशिक्षित तरूण. त्याचे वडील सखाराम परिसरातले नावाजलेले पैलवान.त्यामुळे पैलवानकीचा वारसा आदिनाथकडे आपोआप आला. आदिनाथ कोल्हापुरातील गंगावेशमधील एका तालमीत दोन-तीन वर्षे राहिला. तेथे कुस्ती शिकून घेतली. अनेक मैदान जिंकलीत आणि कुस्ती त्याने गावातील तरुणांमध्ये रुजवण्याचा ध्यास घेतला. तो कुस्ती शिकविण्यासाठी गावाकडे गेला; पण गावातील तालमी बंद अवस्थेत होत्या. अनेक अडीअडचणींचा सामना करत त्याने तालमीची डागडुजी केली. गावातील अनेक पैलवानांमध्ये जागृती करून कुस्ती जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. हळू हळू छोटे पैलवान आदिनाथच्या तालमीत येऊ लागले. सुरुवातीला आठ-दहा वीस असे करत पन्नास लहान-मोठे मल्ल आदिनाथकडे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत.

क्लिक करा -  चक्क... डोक्‍याने नारळ फोडणारे हे कोल्हापुरी राॅकेट आण्णा...

पारंपरिक, मॅट वरील कुस्तीचे तो देतोय मोफत प्रशिक्षण

मल्लविद्येचे शिक्षण घेण्यासाठी मुलांना तालमीत राहण्याची सुविधा त्याने केली आहे. मुलांसाठी एक मातीची तालीम असून, दुसरी आहे मॅटवरची. एका तालीमीत पन्नास मुले खेळू शकत नाहीत. आखाड्यात एका वेळी चार कुस्त्या लावल्या जातात. त्यामुळे तो मुलांना मातीतील व मॅट वरचे प्रशिक्षण देतो. या तालमीमध्ये पंचवीस मुले राहतात. उर्वरित मुले येऊन जाऊन करतात. सायंकाळी सहा वाजता हे मल्लविद्येचे प्रशिक्षण सुरू होते  रात्री नऊला संपते.पहाटे पाचला पुन्हा सराव सुरू होतो. पळणे, फुटबॉल तसेच पेटी हा व्यायाम प्रकार आदिनाथ शिकवतो.

 त्याच्या आखाड्यातले मल्ल गाजवत आहेत मैदाने

आदीनाथने प्रशिक्षण दिलेली तीस किलो वजन गटात वैष्णवी भगवान यादव हिने पुणे आळंदी येथे ब्राँझपदक पटकावले आहे. राज्य कुस्ती स्पर्धेसाठी रूत्वीक लाड, प्रतीक पाटील, शुभम पाटील, उज्ज्वल बंगे, शुभम लाड यांनी यश मिळवले. अनेक विद्यार्थ्यांनी कुस्त्या जिंकून भागातील मैदाने गाजवली आहेत.

ग्रामीण भागातील कुस्ती हळूहळू बंद होत आहे. गावोगावी तालमी जिवंत ठेवून मल्ल घडविणे गरजेचे आहे. तरुणांनी कुस्ती या क्रीडाप्रकारात येण्याची गरज आहे. कुस्तीमुळे आपली शारीरिक व मानसिक जडणघडण होते. खास मुलांसाठी कुस्ती संकुल उभे करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे. 
- आदिनाथ बंगे, कुस्ती प्रशिक्षक, आळवे (ता. पन्हाळा)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: struggle of young man to create a new wrestlers