फुटबॉलपटू सुब्रत पॉल उत्तेजक चाचणीत दोषी 

Subrata Paul
Subrata Paul

नवी दिल्ली - भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सुब्रत पॉल हा उत्तेजक चाचणीत दोषी ठरला असून, त्याच्यावर चार वर्षांची बंदी येऊ शकेल. भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत. दरम्यान, सुब्रतने ब चाचणीचा आग्रह धरला आहे. 

भारतीय फुटबॉल संघाचे कंबोडिया; तसेच म्यानमारच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत सराव शिबिर झाले होते. त्या वेळी संघातील सर्वच खेळाडूंची राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) चाचणी घेतली होती. 18 मार्च रोजी घेतलेल्या या चाचणीत तो दोषी ठरला आहे. त्याने टर्ब्युटलाइन हे उत्तेजक घेतले असल्याचे नाडाच्या अहवालात म्हटले आहे. 

पॉल सध्या आय लीगमध्ये डीएसके शिवाजीयन्स संघातून खेळत आहे; मात्र तो नुकतीच झालेल्या बंगळुरू एफसीविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. त्याने घेतलेले उत्तेजक हे प्रामुख्याने श्वसनाचा त्रास होत असेल तर किंवा दमा असेल तर दिले जाते. खोकल्यासाठी घेतल्या जात असलेल्या औषधातही प्रसंगी टर्ब्युटलाइन असते. 
पॉलबाबतच्या चाचणीचा अहवाल ऐकून धक्का बसल्याचे दास यांनी सांगितले. त्याच्या चाचणीचा अ नमुना दोषी आढळला आहे. चाचणीविरुद्ध सुब्रत नक्कीच दाद मागू शकेल. या परिस्थितीत त्याच्या ब नमुन्याची चाचणी होईल; मात्र त्याने बंदी तात्पुरती उठवण्याबाबत दाद मागितल्यासच त्याला खेळता येऊ शकेल. त्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, असे दास यांनी सांगितले; तसेच त्यांनी नियमानुसार त्याच्यावर चार वर्षांची बंदी येऊ शकेल, असेही स्पष्ट केले. 

दास यांनी पॉल याने आतापर्यंत भारतीय फुटबॉल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर कोणताही संपर्क साधलेला नाही, असे स्पष्ट केले. आय लीगच्या सीईओ सुनंदो धर यांनीही अद्याप नाडाचा कोणताही अहवाल मिळाला नसल्याचे सांगितले. नाडाने अहवाल अधिकृतपणे जाहीर केल्यावर पॉल दोन आठवड्यांत त्यास आव्हान देऊ शकतो. 

हा आहे सुब्रत पॉल 
- अर्जुन पुरस्कार विजेता गोलरक्षक 
- 2007 मध्ये पदार्पण, 2015 पर्यंत 64 आंतरराष्ट्रीय लढती खेळला आहे 
- 2007, तसेच 2009 मधील नेहरू चषक विजेतेपदात मोलाची कामगिरी 
- 2008 मध्ये एएफसी कप जिंकलेल्या संघातही. या यशामुळे भारत 2011 च्या आशिया कपला पात्र ठरला होता. 
- आशिया कप स्पर्धेच्या वेळी इंडियन स्पायडरमॅन असे माध्यमांनी म्हटले होते 
- कंबोडिया, तसेच म्यानमार दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड; पण अंतिम संघात स्थान नाही 
- आयएसएलमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून खेळला, तर आय लीगमध्ये डीएसके शिवाजीयन्सकडून 

फुटबॉलपटू प्रामुख्याने स्वच्छच 
भारतात फुटबॉलपटू क्वचितच उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. 2002 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी महिंद्र युनायटेडचा अरुण मल्होत्रा दोषी ठरला होता. त्यानंतरचा पॉल हा चाचणीत दोषी ठरलेला पहिलाच स्टार खेळाडू. अर्थात, 2011 मध्ये निशांत मेहतावर नाडाने दोन वर्षांची बंदी घातली होती, तर 2015 मध्ये मुंबई एफसीचा डेन परेरा चाचणीत दोषी ठरला होता. 

चाचणीत दोषी ठरल्याचे ऐकल्यावर धक्काच बसला. मला याबाबत नाडा किंवा भारतीय फुटबॉल महासंघाने काहीही कळवलेले नाही. मला हे प्रसार माध्यमांकडूनच समजले आहे. मी काहीही गैरकृत्य केलेले नाही. त्यामुळे मी ब नमुना तपासणीचा आग्रह धरणारच. कामगिरी उंचावण्यासाठी मला कधीही उत्तेजकांची गरज भासली नाही. 
- सुब्रत पॉल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com