फायनलची संधी भारत साधणार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

आम्ही लढती गमावल्या असतील, पण प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच झुंजवले आहे. काही चुका टाळल्या असत्या, संधी साधल्या असत्या, तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता. हेच दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मलेशियाचे मार्गदर्शक व्हॅन हुईझेन यांनी सांगितले. 
 

इपोह / मुंबई - सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेतील अंतिम फेरीपासून भारत एक विजय दूर आहे. ब्रिटन - न्यूझीलंड लढतीच्या निकालाचा विचार न करता आपल्या कामगिरीवर लक्ष पूर्ण केंद्रित केल्यासच भारताचा फायदा होऊ शकेल. 

गतविजेत्या ऑस्ट्रेलियास अंतिम फेरी निश्‍चित करण्यासाठी जपानविरुद्ध बरोबरी पुरेशी आहे. ब्रिटन - न्यूझीलंड या लढतीनंतर भारताची मलेशियाविरुद्धची लढत होईल. आता अंतिम फेरीसाठी मोठ्या फरकाने विजय आवश्‍यक असल्यास आव्हान खडतर होईल. जपानविरुद्ध हॅटट्रिक केलेला मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंग सोडल्यास एकही भारतीय आक्रमक गोलक्षेत्रात धोकादायक वाटत नाही. भारताची गोल करण्यासाठी प्रामुख्याने मदार रूपिंदर पाल सिंग आणि हरमनप्रीत सिंग या ड्रॅग फ्लिकर्सवरच आहे. 

जपानने झुंजवल्यामुळे भारतीय मार्गदर्शक रोएलॅंट ऑल्टमन्स नाराज होते. कोणत्याच संघाला कमी लेखायचे नसते. जपानने कसे आव्हान दिले ते आपण सर्वांनी बघितलेच. मलेशिया चांगला संघ आहे. आम्ही मलेशियाच्या आव्हानास सामोरे जाण्यास तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. मलेशियाने यापूर्वी अनेकदा भारतास झुंजवले आहे. त्यातच घरच्या मैदानावरील अखेरच्या साखळी सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्यास ते उत्सुक असतील. 

आम्ही लढती गमावल्या असतील, पण प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच झुंजवले आहे. काही चुका टाळल्या असत्या, संधी साधल्या असत्या, तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता. हेच दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मलेशियाचे मार्गदर्शक व्हॅन हुईझेन यांनी सांगितले. 

समीकरणे अंतिम फेरीची 
- ऑस्ट्रेलिया दहा गुणांसह आघाडीवर, तर भारत, ब्रिटन, न्यूझीलंडचे प्रत्येकी सात गुण 
- भारत तसेच ब्रिटनचा गोलफरक +2, मात्र केवळ एक गोल जास्त केला असल्यामुळे भारत (10) ब्रिटनच्या (9) पुढे 
- न्यूझीलंड गोलसरासरीत - 1 मागे 
- ब्रिटनची अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध लढत 
- ही लढत निकाली ठरल्यास भारतास मलेशियाविरुद्ध विजयच आवश्‍यक 
- भारतास त्याच वेळी गोलसरासरीकडेही लक्ष द्यावे लागणार. 
- ब्रिटन जिंकल्यास त्यांच्या किमान फरकाने विजय आवश्‍यक 
- न्यूझीलंड - ब्रिटन बरोबरी झाल्यास भारताला अंतिम फेरीसाठी हार टाळणेही पुरेसे ठरेल; पण त्याच वेळी ब्रिटनला एकंदर गोलात मागे टाकणेही आवश्‍यक 
- स्पर्धा कार्यक्रमानुसार सुरवातीस उद्या (ता. 5) पहिली लढत ब्रिटन - न्यूझीलंड, तर भारत-मलेशिया यांच्यात अखेरची साखळी लढत 
- खेळातील अनिश्‍चिततेमुळे ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीही अद्याप निश्‍चित नाही, ते अखेरच्या सामन्यात जपानविरुद्ध खूपच मोठ्या फरकाने हरले तर भारत, ब्रिटन, न्यूझीलंड त्यांना मागे टाकू शकतात. 
 

Web Title: Sultan Azlan Shah Cup: Confident India take on Malaysia with an eye on summit clash