हॉकी : भारताचा न्यूझीलंडवर 3-0 ने विजय

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

आज (रविवार) झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी सुरवातीपासूनच आक्रमक खेळ केला.

इपोह (मलेशिया) - भारताने सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत पहिला विजय मिळवीत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. भारताला पहिल्या सामन्यात ब्रिटनविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.

आज (रविवार) झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी सुरवातीपासूनच आक्रमक खेळ केला. भारताकडून पहिला गोल मनदीप सिंगने 24 व्या मिनिटाला नोंदविला. त्यानंतर तीनच मिनिटांनी 27 व्या मिनिटाला हरमनप्रीतसिंगने दुसरा गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर सामना संपण्यात 12 मिनिटे शिल्लक असताना 48 व्या मिनिटाला हरमनप्रीतने दुसरा गोल नोंदवत भारताचा विजय निश्चित केला. भारताच्या मजबूत बचावामुळे न्यूझीलंडच्या खेळाडू गोल करण्यापासून दूर राहिले. 

भारताची या स्पर्धेतील सुरवात निराशाजनक ठरली. ब्रिटनविरुद्ध दोन वेळा आघाडी घेऊनही भारताला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. अखेरच्या क्षणी ब्रिटिश कर्णधाराच्या चुकीमुळे भारताचा पराभव टळला होता.

Web Title: Sultan Azlan Shah Cup Hockey: India beat New Zealand 3-0 to get their first win of the tournament